एलटीटी-मडगांव पॅण्ट्री कारमध्ये उंदराचा वावर, कंत्राटदाराला रेल्वेने ठोठावला इतका दंड
रेल्वेच्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असतात. आता मध्य रेल्वेच्या एलटीटी-मडगांव ट्रेनच्या पॅण्ट्री कारमध्ये चक्क एका उंदराचा बिनधास्त मुक्तसंचार सुरु असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव ( LTT – Madgaon train ) धावणाऱ्या ट्रेनच्या पॅण्ट्रीकारमध्ये उंदराचा बिनधास्त सुळसुळाट सुरु असल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतल्यानंतर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) या संबंधित कंत्राटदाराला 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. यापूर्वी रेल्वेच्या जेवणात झुरळ तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण पुरविल्याच्या तक्रारी अनेक वेळा आल्या आहेत.
एलटीटी – मंडगाव ट्रेन कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसवर यार्डात उभी असताना 15 ऑक्टोबर रोजी एका जागरुक प्रवाशाने हा उंदराचा व्हिडीओ आपल्या मोबाईलने शुट केल्याचे म्हटले जात आहे. या पॅण्ट्रीकार मधील उंदाराच्या सुळसुळाटाचा हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसी कंपनीने या प्रकरणात मध्य रेल्वेवर खापर फोडले आहे. मध्य रेल्वेने यार्डात स्वच्छता न राखल्याने आणि वेळीच औषधे न फवारल्याने उंदीर वाढल्याचा आरोप आयआरसीटीसीने केला आहे. दरम्यान, आयआरसीटीसीने या प्रकरणात या प्रकरणातील दोषी कंत्राटदारावर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भांडी नीट झाकून न ठेवल्याने आणि अन्नपदार्थ नीट बंद करुन न ठेवल्याने उंदीर आकर्षित झाल्याने या प्रकरणात कंत्राटदाराला दोषी ठरवित ही दंडात्मक कारवाई केल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे.
उंदराचा हाच तो व्हिडीओ –
तातडीने कारवाई
मध्य रेल्वेने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही उंदराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उंदराचे सापळे लावणे आणि केमिकलचा वापर करीत स्वच्छता मोहीम घेतली आहे. आयआरसीटीसीने या प्रकरणात सोशल मिडीयावर स्पष्ट केले आहे की या प्रकरणाची योग्य दखल घेण्यात आली असून पाठपुरावा करण्यात आला आहे.