सत्तासंघर्षानंतर बाळासाहेबांसाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदाच समोरासमोर येणार?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज अखेर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज अखेर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 97व्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाची पत्रिका छापून आल्यापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. कारण या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचं नाव टाकण्यात आलेलं नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.
या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येईल की नाही? याबाबत अनेकांना साशंकता होती. अखेर राज्य सरकारकडून अधिकृतपणे कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय.
राज ठाकरेंनाही निमंत्रण
याआधी राज्य सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ठाकरे कुटुंबातील या दोन नेत्यांपैकी कोण-कोण कार्यक्रमाला हजर राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विधान भवनच्या सचिवांनी ‘मातोश्री’ला जाऊन दिलं निमंत्रण
दरम्यान, विधान भवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय. मात्र, त्यांची काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही.
…तर शिंदे-ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर येणार
महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आता सहा महिने पूर्ण झाले आहेत. या सहा महिन्यात बऱ्याच महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडे लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिंदे गटाची बाजू आजच्या घडीला भक्कम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरुन सुरु असलेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून लोकप्रतिनिधींच्या संख्येच्याच मुद्दा प्रखरपणे मांडला जातोय.
गेल्या सहा महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांचे अनेक जवळची माणसं शिंदे गटात गेली. याशिवाय मुंबई, ठाणे पाठोपाठ नाशिकमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात धरला. त्यामुळे ठाकरे यांच्यापुढील आव्हानं वाढत चालली आहे.
या दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची एकदाही समोरासमोर भेट झालेली नाही. खरं म्हणजे या भेटीची महाराष्ट्रातील जनताही प्रतिक्षा करत आहे. ठाकरे-शिंदे समोरासमोर आले तर काय बोलतील, त्यांचे हावभाव काय असतील? याबाबत राज्यातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे. याशिवाय दोन्ही नेत्यांची भेट झाली तर पुन्हा पूर्वीसारखं पूर्ववत होईल, अशी आशा अनेक शिवसैनिकांना आहे. त्यामुळे या भेटीची राज्यभरात उत्सुकता आहे.