Uddhav Thackeray : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं हे शेवटचं अभिवादन? कर्मचाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत आदित्यसह हात जोडत गेले
मला माझ्याच लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. सर्वांना हात जोडून अभिवादन केले.
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सर्वांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील होते. या कॅबिनेट मिटींगमध्ये (Maharashtra cabinet meeting) विविध निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचेच आभार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले. आपल्याच लोकांनी दगा दिल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी अशाप्रकारे सर्वांचे आभार मानल्यामुळे हे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून निरोपाचे भाषण होते का किंवा मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अभिवादन आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्या बहुमत चाचणी (Maharashtra floor test) होणार आहे. त्या पूर्वसंध्येला आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. नामांतरासह विविध शैक्षणिक आणि सामाजिक निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
उद्या ठरणार भवितव्य
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्याला शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र उद्याची बहुमत चाचणी होणार असून यात महाविकास आघाडी सरकारसमोर मोठे संकट आहे. शिवसेनेचे 39 तर इतर 12 असे 51 आमदार सोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. भाजपाच्या साथीने ते सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तर उद्याच्या बहुमत चाचणीनंतर राज्यात भाजपाचे सरकार येणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे झाले भावनिक
मला माझ्याच लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. सर्वांना हात जोडून अभिवादन केले. त्यामुळे हे त्यांचे मुख्यमंत्री म्हणून अखेरचे अभिवादन ठरते की काय, यासाठी उद्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे हे निरोपाचे भाषण किंवा भावना नव्हत्या, असे संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र त्यांची नाराजी यामाध्यमातून स्पष्टपणे दिसून आली. बंडखोरांना महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.