संजय राऊत माझ्यावर बोलला तर सभेत घुसेल, चौकटीत बोला… कुणी दिला इशारा?
येत्या 23 तारखेला होणारा हा कार्यक्रम शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील.
अनिल केऱ्हाळे, जळगाव : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना जळगावात यायचंय तर येऊ देत. त्यांनी सभाही घेऊ देत. मात्र दोघांनीही चौकटीत बोलावं. त्यातल्या त्यात संजय राऊतसारखा माणूस माझ्यावर बोलत असेल तर मी भर सभेत घुसेल, असा इशारा जळगावचे शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय. उद्धव ठाकरे व संजय राऊत हे येत्या काही दिवसात जळगावात येत आहे. माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. या दोघांचंही जळगावात स्वागत आहे, असं गुलाबराव पाटील म्हणालेत, मात्र त्यांना इशाराही दिलाय.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. यावर गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ आर ओ तात्यांचे माझ्यावर उपकार आहेत. शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरासाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत येत असतील तर त्यांचे स्वागत मात्र त्यांनी चौकटीत बोलावं. तसं पत्र मी एसपींना देणार आहे. संजय राऊत सारखा माणूस माझ्याविषयी बोलणार असेल तर सभेत घुसेल असा थेट इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
मार्च महिन्यात मालेगाव येथील सभेत संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील तसेच नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्यावर सणकून टीका केली होती. संजय राऊत हे राज्यसभेवर आमच्यामुळे निवडून गेले असं गुलाबराव पाटील म्हणाले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अरे मिंध्या पहिले आम्ही दिलेलं मत वापस कर. कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे, त्याचप्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे, अशी टीका राऊत यांनी केली होती.
ठाकरे विरुद्ध शिंदे गट
जळगावचे शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना इशारा दिला आहे. येत्या 23 तारखेला होणारा हा कार्यक्रम शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्व. आर ओ तात्या यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडलेले पहायला मिळतील. त्यामुळे परस्परांवर आरोप-प्रत्यारोपही होतील.