मुंबई : आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच… हे जयंत पाटील यांचं वाक्य सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून अनेकदा येतो. आता पुन्हा एकदा तशीच चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारचं कोरोना काळातील कामाबाबत कौतुक केलं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टप्प्यातील ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये योगी सरकारने अभूतपूर्व काम केलं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने चांगलं काम केलं आहे, अशी स्तुती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यावर ‘उत्तरप्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल, तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा मी विचार करतोय !’ असं म्हणत जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. कोरोनामुळे रुग्णांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यानं मृतदेह जाळायला स्मशानभूमीही कमी पडली. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन केले. सरकारने मनाई केल्यानंतरही लोकांनी गंगेच्या काठावर मृतदेह पुरले. त्यामुळे पाहावं तिकडे मृतदेहच मृतदेह दिसले. त्यांची मोजदाद करणंही शक्य राहिलं नव्हतं.
गंगेच्या काठावर मृतदेह दफन केलेल्या आणि गंगेत मृतदेह सोडल्या जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची भावनाही निर्माण झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारवर टीकाही होत होती. देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती.
मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले. प्रयागराजच्या श्रृंगवेश्वर धामजवळ मृतदेहांना दफन करण्याचं काम सुरू होते. त्यामुळे घाटावर सर्वत्र प्रेतच दिसून येत होते..