Ajit Pawar यांना मोठा धक्का, रात्री 12 नंतर Jayant Patil यांनी उचललं मोठं पाऊल!
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून रात्री 12 नंतर अजित पवार यांना धक्का देणारी मोठी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली. काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती पाटलांनी दिली.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांविरोधात न्यायालयामध्ये जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून रात्री 12 नंतर अजित पवार यांना धक्का देणारी मोठी घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी पक्षाला कोणतीही कल्पना न देता सत्ताधारी पक्षात जात शपथ घेतली. शरद पवार यांना अंधारात ठेवत ही कृती केली त्यामुळे आम्ही संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना मेल पाठवला आहे. अध्यक्षांनी आमची बाजू ऐकून घ्यावी, विधानसभेचे अध्यक्ष यांनी लवकरात लवकर आम्हाला बोलवावं. उद्या लवकरात लवकर या पिटिशनसाठी आमची बाजू ऐकून घ्यावी यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विनंती केली आहे. निवडणूक आयोगालाही याबाबत आम्ही माहिती दिली नाही. 9 आमदार म्हणजे पक्ष होऊ शकत नाही, आम्ही सर्व कायदेशीर पावलं उचलली असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. या आमदारांना माघारी परतायचं असून त्यांना भाजपसोबत जायचं नाही. आकडेवारीमध्ये आज काही जात नाही कारण बरेच आमदार परत यायचं बोलत आहेत त्यामुळे त्यांच्यावर आम्हाला अन्याय करायचा नाही. मात्र ज्यांनी शपथ घेतली आहे त्यांनी पक्षाला धोका दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
विधानसभा जिंकण्याचा भाजपला विश्वास नसावा त्यामुळे भाजपने हे पाऊल उचललं असावं. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णयाचा अधिकार आहे. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला आहे. गेलेले आमदार माझे सहकारी नाहीतर कुटुंबातील लोक आहेत, ही घटना मला वेदना देणारी आहे. शरद पवार हीच आमची प्रेरणा असून नव्या उमेदीने संघटना उभी करू. नाती आणि कामात गल्लत नको याची जाणीव असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.