NCP Ministers Meet Sharad pawar : अजित पवार यांच्या गटातील सर्व मंत्र्यांनी घेतली शरद पवार यांची भेट; जयंत पाटील यांनी सांगितलं भेटीत काय झालं?
NCP Ministers Meet Sharad pawar : जयंत पाटील म्हणाले, विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्यांची अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा फोन आला. शरद पवार यांनी तातडीने बोलावले, असं सांगितलं.
मुंबई : आज मोठी राजकीय घडामोड घडली. अजित पवार गटातील सर्व मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार हे आमचे दैवत आहेत. शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही वेळ न मागता आलो भेटलो. शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. पक्ष एकसंघ कसा राहू शकतो, याचे मार्गदर्शन करावे आणि विचार करावे. अशी विनंती शरद पवार यांना करण्यात आली. शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं म्हणणं ऐकून घेतलं. असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
आमचे दैवत, नेते शरद पवार साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील इतर सर्व मंत्री आज यशवंतराव चव्हाण सेंटरला वेळ न मागता आलो. शरद पवार चव्हाण सेंटरला मिटिंगनिमित्त आल्याचं कळलं. म्हणून संधी साधून सर्व येथे आलो. शरद पवार यांचे पाय पडून आशीर्वाद घेतले, असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हंटलं.
विनंती ऐकून घेतली
विनंती केली की, आमच्या सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ कसा राहू शकतो. त्यासाठी त्यांनी योग्य विचार करावा. येणाऱ्या दिवसात मार्गदर्शन करावा. शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. विनंती ऐकून घेतली. भेटीनंतर परत जात आहोत. उद्यापासून राज्याचे विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. सर्व मंत्री आपआपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
सुप्रिया सुळे यांचा फोन आला
या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्यांची अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा फोन आला. शरद पवार यांनी तातडीने बोलावले, असं सांगितलं. राष्ट्रवादीमधून सत्तेत गेलेले सर्व मंत्री, प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. त्यांनी शरद पवार यांना दिलगिरी व्यक्त केली. त्यातून काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
ही अनपेक्षित घटना
आता झालेली घटना झाली. ही अनपेक्षित घटना आहे. यावर विचार केला नव्हता. त्यामुळे यावर भाष्य करणं संयुक्तिक वाटत नाही. सर्वजण बसलेल्यानंतर चर्चा करून पुढची दिशा ठरवू. अचानक पणे भेट झाली. त्यातून दिलगिरी व्यक्त केली. आम्ही काहीही निश्चित केलं नाही, असंही जयंत पाटील यांनी म्हंटलं.
…तर विरोधी पक्षनेत्याची जागा काँग्रेसकडे जाणार
विरोधी पक्षनेत्यासंदर्भात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची चर्चा झाली आहे. काँग्रेसचे आमदार आमच्यापेक्षा जास्त असतील, तर विरोधी पक्षनेतेपदाची जागा ही काँग्रेसकडे जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. अधिवेशन सुरू झाल्यावर ती प्रक्रिया सुरू होईल. २० आमदार आमच्याकडे आहेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत बोललो. ते वरिष्ठांशी बोलतील. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. विरोधी पक्षनेत्याने राजीनामा दिला. त्यामुळे उरलेल्या पक्षांशी विचारविनिमय घेऊन विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल.