Jitendra Awhad : 100 टक्के सांगतो हा खून धनंजय मुंडे यांनी केलेला नाही, पण… जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया काय?
Jitendra Awhad on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा ठाकल्याची पावती महंत नामदेव शास्त्री यांनी दिली. इतकेच नव्हे तर त्यांना क्लीनचिट सुद्धा दिली. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी मोठं विधान केले आहे.

आजचा दिवस धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा दिलासादायक असला तरी भगवानगडाची भूमिकाच आता वादात सापडली आहे. मंत्री मुंडे यांचं समर्थन करताना बोलण्याच्या ओघात महंत नामदेव शास्त्री जे काही बोलून गेले, त्यावरून वाद उफाळणे स्वाभाविकच आहे. वारकरी संप्रदायाच्या गादीने राजकीय भाष्य करताना एकतर्फी बाजू घेणे अनेकांना रूचलेले नाही. तशा अनेक प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहे. त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी तर इशार्यातून नाही तर थेट हल्लाबोल केला आहे. त्याच्या रोकड्या प्रश्नांना नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडे काय उत्तर आहे, हे तेच सांगू शकतील.
वंजारी समाजातील खून झालेल्यांची यादीच वाचली
नामदेव शास्त्री यांनी कुणाची पाठराखण करावी हे सांगण्यात इतपत मी मोठा नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याविषयी त्यांनी जे विधान केलं, ते बोलणं योग्य नाही. त्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे जे मठाधिपती होते, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक होते, याची त्यांनी सध्याच्या महंतांना आठवण करून दिली.




संगीत दिघोळे, काकासाहेब गर्जे, महादेव मुंडे, बापू आंधळे, बंडू मुंडे यांचे खून झाले. तर महादेव गिते, सहदेव सातभाई, राजाभाऊ नेहरकर, बबन गिते, शिवराज बांगर यांच्यासह अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले. यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी नामदेव शास्त्री यांना विचारला.
100 टक्के सांगतो धनंजय मुंडे यांनी खून केला नाही
मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. पण ते निर्दोष नाहीत या गँगला पोसण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलं आहे, असा आरोप आव्हाडांनी केला. आदरणीय माणसांनी आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात. त्यांनी संतोष देशमुख यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे, असे आव्हाड म्हणाले.
अजितदादांवर केली टीका
अजितदादा सांगतात की चुकला तर मोक्का लावीन पण त्यांनीच सांगितले की त्यांनी मोक्यातले आरोपी सोडलेत म्हणून. दादा एकमेव आहेत ज्यांनी सांगितलं की मी मोक्यातले आरोपी सोडवले. माझे फक्त विनंती असेल बाकी काहीही करा पण मोक्यातला आरोपी वाल्मीक कराडला सोडवायला जाऊ नका, असे वक्तव्य आव्हाडांनी केले. धनंजय मुंडेंचं काही करू शकत नाही हे आम्हाला पण माहिती आहे, अशी टीका त्यांनी केली.