मुंबई | 29 जानेवारी 2024 : रणजित सावरकर लिखित असलेलं ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केली नाही, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नथुराम गोडले हा भारतातील पहिला अतिरेकी होता, असा हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना या पुस्तकावरून रणजित सावरकर यांच्यावरही टीका केली आहे. महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने मारलं नाही असं सांगितलं जात आहे. मग मारणारी एखादी अदृश्य शक्ती असेल. काही दिवसांनी म्हणतील महात्मा गांधी तिथे नव्हतेच, असा उपरोधिक हल्लाच जितेंद्र आव्हाड यांनी चढवला आहे. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता. त्यामुळे असल्या लेखकांवर न बोललेलं बरं. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महात्मा गांधी यांचा खून गोडसेने केला हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मग जगभर जाता तिथं गांधी समोर नतमस्तक का होता? नेहरूंनी काही काम केलं नाही, मग काय अदृश्य शक्तीने हे केलं का? गांधींना मारून इंग्लंड ला काय फायदा होणार होता? नेहरू-गांधींना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे, आता जास्त सुरू आहे एवढंच. वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचं काम सुरू आहे. जागतिक बाजारात याला मूर्खपणा म्हणतात. महाराष्ट्र सदनात अशा पुस्तक प्रदर्शनाला दिलीच कशी? गोळ्या कोणी झाडल्या हे पाहणारे अनेक साक्षीदार होते. त्यातले एक काकासाहेब गाडगीळ होते, असंही आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादीच्या कोर्टातील सुनावणीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अध्यक्षांनी मागणी केली असेल आणि कोर्टाने निकाल दिला असेल तर काही गैर आहे असं वाटत नाही. फक्त निकाल व्यवस्थित द्यावा अस आमचं मत आहे, असं आव्हाड म्हणाले.
छगन भुजबळ कधीच सरकारच्या बाहेर पडणार नाहीत. फक्त दोन कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी या दोघांनी घेतली आहे. जीआरचा व्यवस्थित अभ्यास केल्यावर समजेल काय ते. यांना गावागावांतील वातावरण खराब करायचं आहे, असा आरोप त्यांनी केला.