‘आपल्या ताकदीवर आलात तर ठिक, पण मी फोडून आलो असं…’; जितेंद्र आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई | 18 मार्च 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका मुलाखतीत ‘मी पुन्हा येईल’ या कवितेबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण त्यानंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन झालं. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रुपाने राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
“घर फोडणं, पक्ष फोडणं याला जर स्वतःच्या नीतीचा भाग जर कोणी समजत असेल तर ते दुर्दैव आहे. आपल्या ताकदीवर आलात तर ठिक आहे. पण मी फोडून आलो असं म्हणणं हे योग्य नव्हतं, याची दखल महाराष्ट्राने घेतली आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “खासदार सुप्रिया सुळे जेव्हा खासदार झाल्या तेव्हा त्यांचे वय काय होतं हे तपासून घ्या, जर शरद पवारांनी ठरवलं असतं तर त्या 25 व्या वर्षीच खासदार झाल्या असत्या. एक बाप म्हणून त्यांना प्रेम जरूर आहे, ते असावं. पण त्यांच्या दृष्टीने कार्यकर्ताच म्हणजे माझा. तोच माझ्या विचारांचा वारसदार आहे हे शरद पवारांच्या वागण्यातून दिसतं”, असंही आव्हाड म्हणाले.
‘अजित दादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला’
“शरद पवार हे बीजेपीचे वैयक्तिक शत्रू आहेत. 93 साली गोपीनाथ मुंडे यांनी उघडलेली मोहीम आठवतेय, ते शरद पवारांना व्यक्तिगत टार्गेट करत होते, त्यांना दिसत होतं मतांचं एकत्रीकरण, वेगवेगळ्या पक्षांचे एकत्रीकरण, पवारांचे वेगवेगळ्या लोकांसोबत असलेले संबंध, त्यामुळे शरद पवार संपले तर महाराष्ट्र जातिवादासाठी मोकळा होईल हे बीजेपीला 90 सालीच कळलं होतं. त्यांना आजपर्यंत यश आलं नव्हतं. मात्र अजित दादांच्या रूपाने मोठा मासा त्यांच्या गळाला लागला”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
‘मी उद्धव ठाकरेंवर बऱ्याचदा टीका केली, पण…’
“जस त्यांना ठाकरेंचं घर संपवायचं आहे तसं त्यांना पवारांच्या घरात नामोनिशान मिटवायचं आहे. महाराष्ट्र एवढा कृतघ्न नाही. महाराष्ट्राला शरद पवारांचे योगदान माहीत आहे. महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंचं योगदान माहीत आहे. मी उद्धव ठाकरेंवर बऱ्याचदा टीका केली आहे. पण माझ्या टिकेने ते छोटे होत नाहीत. त्यांचं कर्तृत्व अमान्य होत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात आणि ते असायलाच हवेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“हिंदू कोण याचं सर्टिफिकेट काय बीजेपीकडून घ्यायचं का? यांच्या मंत्र्यांकडून घ्यायचं? हे शिकवणार हिंदू, मुस्लिम द्वेष म्हणजे हिंदुत्व नव्हे, ते त्यांचं हिंदुत्व आहे, पण वसुदैव कुटुंबकम मानणारे असे अनेक हिंदू या देशात आणि विदेशात आहेत”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.