हायकोर्टाचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती धर्माधिकारींचा राजीनामा
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना ओदिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली होती. (Justice S C Dharmadhikari resigns)आता त्यांनी राजीनामा दिला आहे.
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी (Justice S C Dharmadhikari resigns) यांनी आपला राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी आज आपल्या कोर्टात एका वकिलाला आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी राजीनाम्याचं कारण अद्याप सांगितलेलं नाही. न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना ओदिशा हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती मिळाली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Justice S C Dharmadhikari resigns)
काही दिवसांपूर्वी मुंबईत उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायमूर्ती विजया कापसे-ताहिलरमानी यांनीही राजीनामा दिला होता. न्यायमूर्ती विजया कापसे या वरिष्ठ न्यायमूर्ती असतानाही त्यांची मणिपूरच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक केली होती. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. यानंतर आता एस सी धर्माधिकारी यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वकील मॅथ्यू नेदुम्परा यांनी एका याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावेळी न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, “मी राजीनामा दिला आहे, आज माझा शेवटचा दिवस आहे.”
मॅथ्यू नेदम्पुरा यांना न्यायमूर्तींचं हे म्हणणं आधी पटलं नाही. हलकं-फुलकं वक्तव्य म्हणून त्यांनी त्याकडे पाहिलं. मात्र नंतर हे खरं असल्याचं समजताच, आपल्याला धक्का बसल्याचं मॅथ्यू म्हणाले.
न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची 14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली होती. ते सध्या मुख्य न्यायमूर्तीपदाच्या रांगेत होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.