VIDEO | नोकरी वाचवण्यासाठी बेकायदेशीर प्रवास, टीसीने पकडलेल्या इंजिनिअर तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
सरकारने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा त्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Kalyan Based Engineer travel Illegal From Mumbai Local to Save Jobs Video Viral)
कल्याण : लोकल प्रवास बंद असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक प्रवासी नोकऱ्या वाचवण्यासाठी बेकायदेशीरपण प्रवास करत आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Kalyan Based Engineer Prem Surose travel Illegal From Mumbai Local to Save Jobs Video Viral)
प्रेम सुरोसे असे या तरुणाचे नाव असून त्याला परळ स्टेशनवर टीसीने पकडले होते. त्यानंतर त्याने याबाबतचा व्हिडीओ शूट करुन फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरलही झाला. या व्हिडीओनंतर सरकारने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, अन्यथा त्यांनी जगायचं तरी कसं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकलमुळे हजारो प्रवाशांच्या नोकऱ्या गेल्या
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सरकारने सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. यामुळे खाजगी नोकरदार वर्गाचे मात्र मोठे हाल होत आहेत. कारण आधीच तुटपुंजा पगार आणि दररोजचा रस्ते प्रवासाचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावं लागलं आहे. अशावेळी खासगी कंपन्यासुद्धा त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या नाहीत. जर कामावर आला नाहीत, तर नोकरी सोडावी लागेल, असं फर्मान सोडलं आहे. ज्यामुळे हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या.
नेमकं काय घडलं?
असाच एक तरूण म्हणजे कल्याण जवळच्या वरप गावात राहणारा प्रेम सुरोसे. मुंबईत नोकरी करणाऱ्या प्रेम यांना लोकल बंद झाल्यामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 23 जूनला प्रेम हा पुन्हा एकदा मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला. मात्र येण्या-जाण्याचा रस्ते प्रवासाचा खर्च त्याला परवडण्याजोगा नव्हता. म्हणून त्याने लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकलचं तिकीट फक्त अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवूनच मिळत असल्याने त्याने 24 जूनला तिकीट न काढता कल्याण ते परळ पर्यंतचा प्रवास केला.
मात्र दुर्दैवाने परळ रेल्वे स्थानकात त्याला टिसींनी पकडलं. यावेळी त्याने टिसींसमोर आपली व्यथा मांडली. तसेच सध्या आपल्या खात्यात फक्त 400 रुपये असल्याचंही त्यांना दाखवलं. मात्र नियमानुसार दंड भरणं भाग असल्यामुळे त्याने एक व्हिडीओ तयार करत आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
सर्वसामान्यांसमोर अनेक प्रश्न
त्याच्याप्रमाणेच आज हजारो खाजगी नोकरदार लॉकडाऊनमुळे आर्थिकदृष्ट्या अक्षरशः पिचले आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी घर कसं चालवावं? मुलाबाळांकडे लक्ष कसं द्यावं? त्यांची ऑनलाईन शिक्षणाची फी कुठून भरावी? की मिळालेला सगळा पगार फक्त येण्या-जाण्याचा खर्च करण्यात घालवावा? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत.
जर त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसेल, तर किमान प्रवासाचे अन्य काही पर्याय तरी सरकारने खासगी नोकरदार वर्गासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी खाजगी नोकरदार वर्गाकडून केली जात आहे. त्यामुळे आता याकडे सरकार लक्ष देतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. (Kalyan Based Engineer Prem Surose travel Illegal From Mumbai Local to Save Jobs Video Viral)
महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध, दुकान सुरु करण्याच्या वेळेत बदल, कोल्हापूरसह नागपुरात व्यापारी संघटना आक्रमकhttps://t.co/4Er3jnhIlu #Nagpur #Kolhapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
संबंधित बातम्या :
महामारीतल्या या गर्दीचं करायचं तरी काय? मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर जल्लोष
नियम बदलले, कल्याण-डोंबिवलीत आता दुकाने 4 वाजेपर्यंतच, बसमध्ये उभं राहून प्रवास करता येणार नाही
नवी मुंबईच्या मसाला मार्केटमधील अतिधोकादायक इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, दुर्घटनेची शक्यता