कल्याण ते नवीमुंबई प्रवास काही मिनिटांत घडणार, मेट्रो मार्ग 12 आणि 9 तसेच 7 ( अ ) च्या डेपोसाठी जमिनही मिळाली
मुंबईत सध्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वन, 2 ( अ) आणि 7 अशा तीन मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. तर मेट्रो मार्ग 2 ( ब) , 4, 4 (अ) ,5,6, 7 (अ) आणि 9 या सात मेट्रो मार्गिकांचे काम प्रगतीपथावर आहेत.
मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : मुंबई महानगरात विविध सात मेट्रो मार्गिकांची कामे विविध टप्प्यावर सुरु आहेत. मेट्रो मार्ग 12 आणि 9 तसेच 7 ( अ ) च्या डेपोसाठी एमएमआरडीला राज्य सरकारने जमिन ताब्यात दिली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात मेट्रोचे जाळे विणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो ट्रेनचे कार्यक्षम संचालन, देखभाल आणि दुरुस्ती सुलभ होणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-12 च्या डेपोसाठी कल्याण तालुक्यातील मौजे निळजेपाडा येथील 47 हेक्टर जमीन एमएमआरडीएला मिळाली आहे. तसेच मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा ही मार्गिका, मेट्रो मार्ग 5 ठाणे- भिवंडी कल्याण या मार्गिकेसोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे कल्याण ते नवीमुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मेट्रो मार्ग 9 आणि 7 (अ ) साठी मौजे डोंगरी येथील येथील 59.63 हेक्टर जागेचा आगाऊ ताबा ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी एमएमआरडीएला दिला आहे. या दोन्ही जागांमुळे ठाणे जिल्ह्यातील दोन महत्वपूर्ण मेट्रो मार्गिकांसाठी डेपो उभारुन तेथे मेट्रो उभ्या करण्याची सोय होणार आहे. नागरी प्रकल्पांसाठी सरकारी भूखंड नसेल तर अशा प्रकल्पासाठी गायरान जमीनीचे परिवर्तन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जमिनीचे भोगवटामुल्य कितीही असले तरी अटी व शर्तींना अधीन राहून संबंधित जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारांचा वापर करू शकतात. संबंधित जिल्हाधिकारी अशी जमीन राज्य सरकारच्या संबंधित विभागास महसूल मुक्त व सारा माफीने प्रदान करण्यास सक्षम असतो. त्या नुसार एमएमआरडीएला ठाणे जिल्हाधकाऱ्यांनी ही जमिन विनामूल्य हस्तांतरित केली आहे. मुंबईत सध्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वन, 2 ( अ) आणि 7 अशा तीन मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. तर मेट्रो मार्ग 2 ( ब) , 4, 4 (अ) ,5,6, 7 (अ) आणि 9 या सात मेट्रो मार्गिकांचे काम प्रगतीपथावर आहेत.
कल्याण ते नवीमुंबई प्रवास काही मिनिटांत घडणार
मेट्रो मार्ग 10 साठी विविध पर्यावरण विषयक परवानग्या मिळवण्यासाठी सल्लागाराची नेमणूक केली जात आहे, तर मेट्रो मार्ग 14 (कांजूरमार्ग ते बदलापूर) साठी सल्लागाराने मसुदा अंतिम अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल आयआयटी मुंबईकडे पिअर रिव्ह्यूसाठी पाठवला आहे. 20.7 किमी लांबीच्या प्रस्तावित असलेल्या मेट्रो मार्ग -12 च्या आराखड्यात विस्तार करून ती नवी मुंबई मेट्रोसोबत जोडण्याचा निर्णय होणार आहे. मेट्रो मार्ग 12 कल्याण ते तळोजा ही मार्गिका, मेट्रो मार्ग 5 ठाणे- भिवंडी कल्याण या मार्गिकेसोबत जोडली जाणार आहे. त्यामुळे कल्याण ते नवीमुंबई प्रवास देखील काही मिनिटांत शक्य होणार आहे.