Kashmir Target Killing : काश्मीरच्या टार्गेट किलिंगचे मुंबईत पडसाद! मिनारा मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची निषेध रॅली

| Updated on: Jun 05, 2022 | 9:26 AM

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या महिनाभरात सुमारे नऊ हिंदुंची हत्या करण्यात आली. याविरोधा रझा अकादमीकडून मुंबईच्या मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली.

Kashmir Target Killing : काश्मीरच्या टार्गेट किलिंगचे मुंबईत पडसाद! मिनारा मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांची निषेध रॅली
Follow us on

मुंबई : काश्मीरमध्ये (Kashmir) पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून (Terrorist) टार्गेट किलिंगला (Target killing) सुरुवात झाली आहे. याविरोधात रझा अकादमीकडून मुंबईच्या मिनारा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. हे अत्याचार थांबवा, अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी मागणी रझा अकादमीच्या वतीने करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून टार्गेट किलिंग करण्यात येत आहे. अशा घटनेत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांना टार्गेट केले जात आहे, आम्ही काश्मिरी पंडितांच्या पाठीशी उभे असल्याचे रझा अकादमीचे अध्यक्ष मुहम्मद सईद नुरी यांनी म्हटले आहे. गुरुवारी जम्मू -काश्मीरमधील कुलगाममध्ये एका बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी त्याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या केली. विजय कुमार असे या बँक व्यवस्थापकाचे नाव होते. या घटनेने काश्मीरमध्ये दहशत पसरली आहे. याविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता तेथील जनतेमधून होत आहे.

महिनाभरात नऊ हिंदूच्या हत्या

गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगामध्ये बँक व्यवस्थापक असलेल्या विजय कुमार यांची हत्या केली. त्यापूर्वी जम्मूच्या सांबा जिल्ह्यात एका 36 वर्षीय हिंदू महिला शिक्षिकेची हत्या करण्यात आली. कुलगाममधील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या महिन्यात काश्मिरी पंडित असलेल्या राहुल भट यांच्यासह दोन नागरिक आणि तीन ऑफड्युटी पोलिसांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंदू आणि काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केले जात आहे. महिनाभरात सुमारे नऊ काश्मिरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दहशतवाद्यांची दहशत निर्माण झाली असून, शेकडो काश्मिरी पंडितांनी पुन्हा एकदा जम्मू काश्मीर सोडला आहे.

हे सुद्धा वाचा

 

मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

दरम्यान काश्मीरमध्ये सुरू असलेल्या टार्गेट किलिंगवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना टार्गेट केले जात आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अनेकांना यामुळे काश्मीर सोडावे लागत आहे. कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरी परतण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र आपण सर्व जण पहातच आहोत काश्मीरमध्ये काय स्थिती आहे. या काश्मिरी पंडितांच्या पाठिमागे शिवसेना कायम उभी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव उघडे असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.