हात कापावा लागलेल्या दोन महिन्यांच्या बाळाला दहा लाखांची नुकसानभरपाई
ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला. यामध्ये प्रिन्सचा हात, कान, डोकं आणि छातीचा भाग जळाला. हाताला गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली.
मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार घेताना भाजल्यामुळे हात कापावा लागलेलं दोन महिन्यांचं बाळ प्रिन्स (KEM Hospital Baby Prince lost arm) आणि नायर रुग्णालयात एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्युमुखी पडलेला तरुण राजेश मारु याच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पालिकेच्या चुकीमुळे विविध दुर्घटनांमध्ये जखमी किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी धोरण आखण्यावर सर्वपक्षीय गटनेत्यांनी मंजुरी दिल्याची माहिती मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
उत्तर प्रदेशहून आलेल्या प्रिन्स नावाच्या दोन महिन्याच्या बाळाला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी भरती करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना ईसीजी मशिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गादीने पेट घेतला. यामध्ये प्रिन्सचा हात, कान, डोकं आणि छातीचा भाग जळाला. हाताला गँगरिन झाल्यामुळे बाळाचा हात कापण्याची वेळ आली.
या प्रकरणाचे पडसाद पालिकेच्या स्थायी समिती आणि सभागृहात उमटले. रुग्णालयाचे डीन, डॉक्टर आदी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची तसेच प्रिन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र त्याच्या कुटुंबियांना पालिकेने 5 लाख रुपये देऊ केले होते. हे पाच लाख रुपये डिपॉझिट म्हणून ठेवण्यात येणार होते. तसेच ते प्रिन्स 18 वर्षांचा झाल्यावरच वापरता येणार होते. प्रिन्सवर आता खर्च करण्याची गरज असताना पालिका रक्कम देत नसल्याने पालिकेने देऊ केलेले 5 लाख रुपये घेण्यास प्रिन्सच्या आई वडिलांनी नकार दिला आहे. याबाबत गटनेत्यांच्या बैठकीत पुन्हा चर्चा करण्यात आली.
सर्वपक्षीय गटनेत्यांच्या दबावामुळे प्रशासनाला प्रिन्सच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. सध्या 5 लाख रुपये प्रिन्सच्या कुटुंबियांना दिले जाणार असून 5 लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जाणार आहेत. त्यामधून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून प्रिन्सवर (KEM Hospital Baby Prince lost arm) उपचार आणि शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे.
याशिवाय, पालिकेच्या नायर रुग्णालयात राजेश मारु याचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला होता, त्याच्याही कुटुंबियांना 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
27 जानेवारी 2018 रोजी 32 वर्षीय राजेश मारु हा तरुण नायर रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या बहिणीच्या सासूला पाहण्यासाठी आला होता. सासूला एमआरआय चाचणी करण्यासाठी एमआरआय केंद्रात आणण्यात आलं होतं. तेव्हा तिथे राजेशसोबत अन्य काही नातेवाईक होते. त्यावेळी आया सुनीता सुर्वेने सर्वांना आपापल्या अंगावरील धातूच्या वस्तू काढून ठेवण्यास सांगितलं, त्याप्रमाणे सर्वांनी केलं.
त्यानंतर वॉर्डबॉय विठ्ठलने राजेशला ऑक्सिजन सिलिंडर आत नेण्याचं काम सांगितले. तेव्हा, सिलिंडरही धातूचाच असल्याचं सांगत काही जणांनी आक्षेप घेतला. त्यावर, एमआरआय मशिन बंद असल्याने काही होणार नाही, असा दावा विठ्ठलने केला होता.
प्रत्यक्षात एमआरआय मशिन त्यावेळी सुरुच होती. त्यामुळे सिलिंडरसह आत शिरताच प्रचंड चुंबकीय शक्तीमुळे राजेश मशिनमध्ये खेचला गेला. त्याचा हात मशिन आणि सिलिंडरमध्ये अडकला आणि त्याचवेळी ऑक्सिजन लीक होऊन त्याच्या नाकातोंडात प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन गेला. त्यामुळे राजेशचं शरीर निळं पडलं आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं.
याप्रकरणी राजेशच्या मेहुण्याने पोलिसात तक्रार नोंदवली होती. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कुटुंबीयांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर मार्चमध्ये मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. या प्रकरणी महापालिकेने नेमलेल्या चौकशी समितीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दिलेल्या अहवालात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर स्पष्ट ठपका ठेवला होता.
मारु कुटुंबीयांना अंतरिम भरपाई म्हणून दहा लाख रुपये देण्याचे आदेश सप्टेंबर 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले होते.
KEM Hospital Baby Prince lost arm