मुंबई : सध्या सोशल मीडियावर केतकी चितळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत केतकीने तिला फेसबूकवर ट्रोल करणाऱ्यांच्या अश्लील भाषेचा चांगलाच क्लास घेतला. काही दिवसांपूर्वी केतकीने आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीचे अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते.
केतकीने आपल्या आधीच्या व्हिडीओत म्हटले होते, “मी माझ्या मराठी बांधवांना सुरुवातीलाच सांगू इच्छिते की मला फक्त मराठी भाषिक लोक फॉलोव करत नाही, तर इतर भाषिक लोकही फॉलोव करतात. त्यामुळे आजचा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल. त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवून नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. कमीतकमी ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. म्हणून कृपया कमेंटमध्ये मराठी विसलीस का? मराठी सिरिअल्समध्ये काम करते इत्यादी गोष्टी लिहू नका.” हे निवेदन केल्यानंतर तिने हिंदी आणि इंग्लिशमध्ये लहान मुलांवरील दबावाबाबत तिची मते व्यक्त केली. मात्र, ती हे बोलत असताना काही ट्रोलर्सने केतकीवर अश्लील भाषेत टीका केली आणि शिव्याही दिल्या.
आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये झालेल्या ट्रोलिंगला गांभीर्यांने घेत केतकीने पुढील फेसबूक लाईव्ह खास ट्रोलर्सच्या कमेंटवरच केले. यावेळी तिने कॅप्शन दिले होते, “यावेळेस संपूर्ण व्हिडीओ पाहाल अशी आशा आहे”. या व्हिडीओत तिने या फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर आलेल्या कमेंटचा खरपूस समाचार घेतला. केतकीने ट्रोलर्सच्या मराठी भाषेच्या व्याकरणापासून ते पोकळ मराठी अभिमानापर्यंत अक्षरशः वाभाडे काढले. अश्लील शेरेबाजी आणि शिवीगाळ करायला लागावी, माझा बलात्कार करायला लागवा इतकी तुमची मराठी संस्कृती तकलादू आहे का? असा सवाल केतकीने केला. तसेच याशिवाय तुमच्या मराठी भाषेला सुवर्ण दिवस लाभणार नाहीत का? अशीही विचारणा केली. बाळासाहेब ठाकरेंचा संदर्भ देऊन अश्लील शेरेबाजी करणाऱ्यांना तिने बाळासाहेबांनी अशी भाषा वापरण्यास सांगितले आहे का? असा उलट प्रश्न विचारत निरुत्तरही केले.
अखेर तिने आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाबद्दलही मत व्यक्त केले. ती म्हणाली, “मी एका व्हिडीओत मराठीविषयी बोलले नाही. जाहीर प्रेम दाखवले नाही, मी मराठी, मी मराठीचा बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाही तर माझी मातृ आणि पितृ भाषा मोडकळीला लागेल, एवढी ती तकलादू नाही. मला माझ्या भाषेवर प्रेम दाखवावे लागत नाही. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एकाच स्त्रीचा निषेध करायला तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करावी लागते, शिवीगाळ करावी लागते, तिचा बलात्कार करावा लागतो, असा महाराष्ट्र माझा नाही. एका बाईची बाई असल्याने तिची थेट तुलना काही कारणांनी शरीर विकावे लागलेल्या बाईशी करणारा महाराष्ट्र माझा नाही. कोणत्याही व्यक्तीचा व्हिडीओ सोयीस्कर कापून खोटंनाटं पसरवणारा महाराष्ट्र माझा नाही. जर महाराष्ट्र खरंच या पातळीवर घसरला असेल, तर महाराष्ट्र माझा म्हणायला मला लाज वाटते. तुम्ही तुमचे संस्कार दाखवले हे माझे संस्कार नाहीत.”
या व्हिडीओच्या अखेरीस केतकीने या स्तरहीन ट्रोलर्सला आता हा व्हिडीओ व्हायरल करणार का? असाही प्रश्न विचारला.