आरोपी गुरमैल सिंह यालाच 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, दुसऱ्याचं काय? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. दुसऱ्या आरोपीबाबत कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या दोन्ही आरोपींची आज वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. विशेष म्हणजे एका आरोपीने आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला. पण त्याचं आधारकार्ड मागितल्यावर त्यावर तो 21 वर्षांचा असल्याचं सिद्ध झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीला कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना आज किला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी गुरमैल सिंह याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर दुसऱ्या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली नाही. दुसऱ्या आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करून पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. वयाचा मुद्दा कोर्टाने गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. पोलीस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोर आरोपींना पकडलं आहे. धर्मराज राजेश कश्यप आमि गुरमैल बलजीत सिंह अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची क्राईम ब्रँच त्याच्या मागावर आहे. या आरोपींना काल अटक केल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. हे दोन्ही शूटर बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. या आरोपींची आज मुंबईत जीटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी 19 वर्षीय आरोपी धर्मराज कश्यप याने आपण 17 वर्षांचा असल्याचा दावा केला. त्याच्या वकिलांनी देखील तसाच दावा केला. दुसरा आरोपी गुरमैल बलजीत सिंह याचं वय 23 वर्षे इतकं आहे.
कोर्टात काय-काय घडलं?
आरोपी धर्मराज कश्यप याने कोर्टात न्यायाधीशांसमोर आपले वय 17 वर्षे असल्याचा दावा केल्यामुळे कोर्टाने त्याच्याकडे आधारकार्डची विचारणा केली. यावेळी आधारकार्ड येईपर्यंत कोर्टाची सुनावणी थांबवण्यात आली. त्यानंतर पुढच्या पाच मिनिटात आरोपीकडे आधारकार्ड सापडलं. त्यात त्याचं वय 19 वर्षे असल्याने ते ग्राह्य धरून आता आम्हाला कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आरोपीने खोटे आधारकार्ड बनवले असेल तर तेही तपासात स्पष्ट होईल, असंही सरकारी वकील म्हणाले. आरोपीचे वकील आरोपीचे वय 17 वर्षे सांगत आहेत. पण ते सिद्ध करणारे कोणताही कागद किंवा पुरावा त्यांच्याकडे नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दरम्यान, आरोपी धर्मराज कश्यप याच्या आधार कार्डनुसार त्याचं वय २१ असल्याचे समोर आले. त्याचं आधारकार्ड कोर्टात सादर करण्यात आलं.
यावेळी पोलीस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी दोन्ही आरोपींची 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. “ज्यांची हत्या झाली ती सामान्य व्यक्ती नसून राज्यमंत्री राहिलेले आहेत. आरोपी उत्तरप्रदेश आणि हरियाणामधून आले होते. ते पुणे आणि मुंबईत राहिले होते. आरोपींनी रेकी केलेली आहे. आरोपींना लोकल लेव्हलला मदत करणरे कोण, त्यांना सगळी साहित्य पुरवणारे कोण? याचा तपास करायचा आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
यावेळी आरोपींकडे तब्बल 28 जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. आरोपी ही हत्या करून शांत बसणार होते की आणखी कोणाची हत्या करायची होती हे तपासायचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. “आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा तपास करावा लागणार आहे. आम्हाला अनेक बाबी तपासायच्या आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणखी कोण यांच्या निशाण्यावर आहेत का हे तपासायचं आहे. आरोपीना बंदूक पुरवणारे कोण आहेत, त्यांना फंडिंग कोणी केलेली आहे हे आम्हाला तपासायचे आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद काय?
जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. पॉलिटिकल रायव्हलरीबद्दल बोलायचं झालं तर सबंधित हत्या झालेली व्यक्ती प्रसिद्ध आहे. त्यांचे अनेक दुश्मन असू शकतात, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यावर सरकारी वकिलांनी भूमिका मांडली. “आम्ही फरार आरोपींच्या शोधासाठी १०-१० टीम केलेल्या आहेत. नियोजित हत्या आणि रेकी करणे, शस्त्र चालवण्याच प्रशिक्षण अशा अनेक बाबी स्पष्ट आहेत. आरोपी साधेसुधे नाहित. त्यांनी पूर्ण प्रशिक्षण घेऊन नियोजित पद्धतीने ही हत्या केलेली आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. “जस्तीत जास्त आम्हाला पोलीस कोठडी मिळाल्यास आम्ही योग्य दिशेने तपास करू शकतो”, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.