Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांना किती मार लागला?, प्रकृती कशी आहे?; जाणून घ्या हेल्थ अपडेट
संदीप देशपांडे हे नेहमी शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जातात. रोज सकाळी त्यांच्यासोबत चारपाच जण असतात. आजच ते पहिल्यांदा एकटे मॉर्निंग वॉकला गेले. त्यामुळे त्यांना एकटं गाठून हल्ला करण्यात आला. हल्लेखोर रोज त्यांच्यावर पाळत ठेवत असावेत.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संदीप देशपांडे जखमी झाले असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वर्दळीच्याच ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने अधिकच खळबळ उडाली आहे. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली आहे. संदीप देशपांडे यांना मार लागला असला तरी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
मनसेचे नेते, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी हिंदुजा रुग्णालायत जाऊन संदीप देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी धुरी यांनी संदीप देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर धुरी यांनी मीडियाशी संवाद साधला. संदीप देशपांडे यांची प्रकृती नॉर्मल आहे. संदीप यांच्या पायाला आणि हाताला मार लागला आहे. पायावर जास्त मार लागला आहे. मात्र, डोक्याला किंवा शरीरावर इतरत्र कुठेही मार लागला नाही, असं संतोष धुरी यांनी सांगितलं. हल्लेखोरांना स्टम्पने हल्ला केल्यानंतर संदीप देशपांडे यांनी आपल्या हाताने वार परतवून लावला. त्यांनी हल्लेखोरांना प्रतिकार केला. तेवढ्यात शिवाजी पार्कातील लोक धावले. त्यामुळे हल्लेखोर तिथून पसार झाले, असंही धुरी यांनी स्पष्ट केलं.
आजचा प्रकार वेगळाच होता
आजचा प्रकार हा वेगळाच होता. हल्लेखोरांना काही औरच करायचे होते. चार पाच हल्लेखोर होते. हे हल्लेखोर धष्टपुष्ट होते. तोंडाला मास्क लावून शिवाजी पार्कात बसले होते. संदीप देशपांडे येताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर लोकांनी गलका केल्याने हे हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोर पळून गेले. कुठे गेले माहीत नाही. पण आम्ही त्यांना गाठू. सीसीटीव्ही फुटेज मिळेल. कोण आहेत ते कळतील, असं त्यांनी सांगितलं.
त्यांना सोडणार नाही
संदीप देशपांडे हे नेहमी शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जातात. रोज सकाळी त्यांच्यासोबत चारपाच जण असतात. आजच ते पहिल्यांदा एकटे मॉर्निंग वॉकला गेले. त्यामुळे त्यांना एकटं गाठून हल्ला करण्यात आला. हल्लेखोर रोज त्यांच्यावर पाळत ठेवत असावेत. आज संदीप देशपांडे यांना नेमकं एकटं पाहिलं आणि हल्ला चढवला. त्यामुळे ते जखमी झाले. पण आम्ही या हल्लेखोरांना सोडणार नाही. हा भ्याड हल्ला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.