मासळी बाजार नवी मुंबईला हलवला, अरविंद सावंतांची उडवाउडवीची उत्तरं, कोळी बांधव शिवसेनेविरोधात आक्रमक
Fish Market | स्थानिक कोळी समाज शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. न्याय द्या अन्यथा रस्त्यावर ऊतरू, असे देवेंद्र तांडेल यांनी म्हटले आहे.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेच्या वादावरुन मुंबईत शिवसेना विरुद्ध कोळी बांधव असा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून घाऊक मासळी बाजार (Fish Market) तात्पुरत्या कालावधीसाठी ऐरोलीला हलवण्यात आला होता. या निर्णयाला स्थानिक कोळी बांधवांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही मुंबई महानगरपालिका दखल घेत नसल्याने कोळी बांधव आक्रमक होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच कोळी बांधवांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अरविंद सावंत यांनी कोळीबांधवांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यामुळे स्थानिक कोळी समाज शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी या निर्णयाविरोधात एल्गार पुकारण्याचा इशारा दिला आहे. न्याय द्या अन्यथा रस्त्यावर ऊतरू, असे देवेंद्र तांडेल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
लॉकडाऊननंतर क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांसमोर नवं संकट
पावसाळ्यात दोन महिने बंद असलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली असली तरी छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील (क्रॉफर्ड मार्केट) विक्रेत्यांपुढे मासे विक्रीचा पेच निर्माण झाला आहे. या बाजारातील धोकादायक इमारती पालिकेने रिकामी केल्याने व्यवसायाचे अर्थचक्र बिघडले असल्याची चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली. तसेच मूळ बाजार परिसरातच पर्यायी जागा शोधताना विक्रेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
मुंबईसह राज्यातील विविध बंदरांवरून मासे येथे येतात. तसेच येथून मासे विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवले जातात. जवळपास पन्नास वर्षे ही बाजारपेठ याच ठिकाणी सुरू असल्याने व्यापाऱ्यांचा ग्राहकवर्ग बांधला गेला आहे. ‘मुंबईतून थेट ऐरोलीत स्थलांतर झाले तर ग्राहक तुटतील आणि व्यवसायावर परिणाम होईल. त्यामुळे पालिकेने मूळ बाजारपेठेच्या परिसरातच पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.
संबंधित बातम्या:
मासेमारी करणाऱ्याला सापडला दुर्मिळ नारंगी मोती, किंमत ऐकून भुवया उंचावतील
कोकणातील मासेमारी व्यवसायाला कोरोनाचा विळखा, निर्यात 40 टक्क्यांनी घटली