मुंबई: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टमधील संजय राऊत यांची बहुचर्चित मुलाखत अखेर पार पडली आहे. खार येथील ‘द हॅबिटेट’ स्टुडिओत रविवारी संध्याकाळी या मुलाखतीचे चित्रीकरण झाले. कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर पोस्ट टाकून संजय राऊत यांची मुलाखत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर संजय राऊत देखील मुलाखत देण्यासाठी राजी झाले होते. या मुलाखतीपूर्वी संजय राऊत आणि कुणाल कामराची भेटही झाली होती. (Sanjay Raut Interview by Kunal Kamra)
‘शट अप या कुणाल’ या पॉडकस्ट कार्यक्रमाचा सोशल मीडियावर चाहतावर्ग आहे. कुणाल कामरा याच्याकडून थेट, उपरोधिक आणि मजेशीर शैलीत विचारले जाणारे प्रश्न या कार्यक्रमाचे आकर्षण असते. त्यामुळे कुणाल कामराचे थेट प्रश्न आणि संजय राऊत यांची बेधडक उत्तरे हा सामना कसा रंगणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
जवळपास दीड तास ही मुलाखत सुरु होती. राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकासआघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगतदार झाली. तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप म्हणून ठेवण्यात आले होते. या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे, यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे आता ही मुलाखत कधी प्रसारित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुणाल स्टॅण्ड अप कॉमेडीसोबतच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या मुलाखती घेतो. कुणालने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने ‘शट अप या कुणाल’च्या पहिल्या सीझनला सुरुवात झाली होती.
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सूर्या यांच्या मुलाखतीही कुणालने आतापर्यंत घेतल्या आहेत.
संबंंधित बातम्या:
मुलाखतीआधी ‘मुलाकात’, संजय राऊत-कुणाल कामराची दीड तास चर्चा
Shut Up Ya Kunal | संजय राऊतांनी ‘शट अप’चे ओपनिंग केले तरच दुसरा सिझन; कुणाल कामराचे खुले निमंत्रण
कुणाल कामराकडून राज ठाकरेंना वडापाव ऑफर, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती
(Sanjay Raut Interview by Kunal Kamra)