एसटी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्याचा पगार थकीत!, कुर्ला डेपोत एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार
राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत पगाराचा निर्णय झाला नाही तर एसटी बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
मुंबई: गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत पगाराचा निर्णय झाला नाही तर एसटी बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तीन महिन्यांचा रखडलेला पगार आणि सानुग्रह अनुदान देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Three months salary of ST employees left, agitation across the state)
आधीच तोकडा पगार आणि त्यात 3 महिन्यांचा पगार थकल्यानं एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जळगावातील एसटीचे वाहक मनोज चौधरी यांनी कमी पगार आणि अनियमिततेला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. कुटुंब चालवताना अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजाही पूर्ण करता येत नाहीत. दिवाळी तोंडावर आली असताना लहान मुलांना काय उत्तरं देणार? असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारला विचारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा तीन महिन्यांचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवता येत नाहीत. अशावेळी जगावं की मरावं असा प्रश्न पडत असल्याची खंत एसटी कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आहे.
वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळला आहे. या एसटी चालकाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पांडुरंग गडदे असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. तसेच प्रलंबित वेतनासाठी आज 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे.
एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार: अनिल परब
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासूनचे एसटी कामगारांचे पगार थकले आहेत. आता दिवाळीही आलीय. त्यातच इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ 2 हजार कोटींचं कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच एसटीकडून राज्यसरकारकडे 3600 कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाकाळात एसटीला मिळणारं २२ कोटींचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. हा तोटा साडे पाच हजार कोटींचा आहे. संचित तोटा वाढल्यानंतर उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. कोरोनामुळे उत्पन्नाची साधनं वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झालं. त्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती.
संबंधित बातम्या:
एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा
बेस्टचा संप मिटत नाही तोवरच एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत
Three months salary of ST employees left, agitation across the state