Ladki Bahin Yojana : या निवडणुका झाल्या की लाडकी बहीण योजना बंद, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे वक्तव्य, म्हणाले काय?
Ladki Bahin Yojana Vinayak Raut : लाडकी बहीण योजनेचा हप्ता नुकताच राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आहे. ही योजना चालवणे सरकारसाठी अपरिहार्य बाब असली तरी ही योजना लवकरच बंद होण्याचा दावा विरोधक करत आहेत...
लाडकी बहीण योजनेचा हप्ता (Ladki Bahin Yojana Installment) नुकताच राज्यातील पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. ही योजना चालवणे सरकारसाठी अपरिहार्य बाब असले तरी ही योजना अजून काही दिवसच सुरू राहणार असल्याचा दावा विरोधक करत आहेत. यापूर्वी सुद्धा ही योजना विधानसभा निवडणुकीपुरता जुमला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेतंर्गत डिसेंबरचा हप्ता जमा झाला. तरीही ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा माजी खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावरून पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले आहे.
विनायक राऊत यांचा दावा काय?
महाराष्ट्र कर्जामध्ये डुबलेला आहे, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं आव्हान अजित दादा कसं पेलणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे, असे वक्तव्य राऊतांनी केले. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकींपर्यंत लाडकी बहीण योजनेचा प्रयोग ते नक्की करतील. त्यानंतर ही योजना बंद पाडतील, असा दावा राऊतांनी केला. या योजनेचा डोलारा सांभाळणे जिकरीचे काम असल्याचा दावा त्यांनी केला. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका संपल्या की ही योजना बंद करण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
मुंबई महापालिकेवर भाजपाचा डोळा
मुंबई महापालिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा डोळा आहे. त्यांना महापालिका हडप करायची आहे, असे ते म्हणाले. मात्र मुंबईकर जनता जागृत आहे. कोणत्याही परिस्थितीत या लुटारूंच्या हातात मुंबईकर जनता महापालिका देणार नाही. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना उबाठा महापालिकेत निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यात गुन्हेगार मोकाट
विनायक राऊत यांनी यावेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. संतोष देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे दिसून आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची गांभीर्याने दखल घेतील याची मला खात्री आहे. पण मागच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीने हत्या होताहेत, लैंगिक अत्याचार, खून होताहेत, दरोडे पडताहेत, त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झालेली आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही, गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
भविष्यात काहीही घडू शकेल
यावेळी विनायक राऊत यांनी केंद्रातील राजकारणावर निशाणा धरला. बीडमध्ये ज्या पद्धतीने 2 हजार पेक्षा रिव्हॉल्व्हरचे परवाने ज्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत, त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, फौजदारी गुन्हे दाखल करावेत. देशामध्ये खूप अराजक निर्माण होत आहे. भाजपच्या केंद्रीय मंडळाबाबत खूप नाराजी आहे, असं दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात काहीही घडू शकेल, असे संकेत दिले.