10 वर्षांपासून जेलमध्ये असणार लॉरेन्स बिश्नोई नेटवर्क कसं चालवतो?; हत्येनंतर जबाबदारी का स्विकारतो?
Lawrence Bishnoi Group : बाब सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई ग्रुपने स्विकारली. बिश्नोई ग्रुपचं काम कसं चालतं? जेलमध्ये असणारा लॉरेन्स बिश्नोई त्याचं नेटवर्क कसं चालवतो? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. याची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी...
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची झालेली हत्या, बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार अन् आता राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून केली गेलेली हत्या… या सगळ्यामागे एका व्यक्तीचा हात आहे, तो म्हणजे लॉरेन्स बिश्नोई… बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. पण एक प्रश्न पडतो, तो म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून गुजरातच्या जेलमध्ये असणारा लॉरेन्स बिश्नोई त्याचं नेटवर्क चालवतो तरी कसं? तुरुंगात असताना एखाद्या व्यक्तीच्या हत्येचा कट तो रचतो तरी कसा?
‘मदतीच्या बदल्यात मदत’
एका तरूणाच्या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई हा अटकेत आहे. मात्र तुरुंगातून लॉरेन्स बिश्नोई त्याच्या गँगला ऑपरेट करतोय. ‘मदतीच्या बदल्यात मदत’ या तत्वाच्या आधारावर लॉरेन्स बिश्नोईने त्याची गँग वाढवायला सुरुवात केली. जेलमध्ये असणाऱ्या लोकांना तो जामीन मिळवून देण्यासाठी कायदेशीर मदत करू लागला. शिवाय या आरोपींना तो लपण्यासाठी जागाही देऊ लागला. यातून त्याचं नेटवर्क अधिक पक्कं होत गेलं. छोट्या मोठ्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या गुन्हेगारांना लॉरेन्स मदत करतो अन् त्यांना आपल्या गँगचा भाग बनवतो. जितेंदर गोगी, काला जठेडी, आनंदपालच्या गँगला त्याने आपल्यासोबत घेतलं. यातून त्याची ताकद आणखी वाढली.
जेलमधून कम्युनिकेशनच्या आणि कनेक्शनच्या जोरावर लॉरेन्स बिश्नोई त्याचं अख्खं नेटवर्क चालवतो. यासाठी त्याने सिस्टिम ‘मॅनेज’ केली आहे. लॉरेन्स बिश्नोईने जेलमधून एक मुलाखत दिली होती. या मुलाखती त्याने सलमान खानला धमकी दिली होती. एखाद्याची हत्या केल्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या हत्येची जबाबदारी स्विकारतो. यातून आपण ‘गँगस्टर’ असल्याचा मेसेज लॉरेन्स बिश्नोई लोकांना देतो. शिवाय मोठ-मोठे लोक आपल्या टार्गेटवर असल्याचं दाखवत तो त्याचा दबदबा ठेवण्याचा प्रयत्न करतो. संपर्कासाठी VOIP अर्थात व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टिमचा लॉरेन्स बिश्नोई वापर करतो.
लॉरेन्स बिश्नोईला अटकेत का आहे?
लॉरेन्स बिश्नोई शिक्षणासाठी चंदिगडमध्ये आला. तेव्हा त्याची ओळख गोल्डी बराड याच्यासोबत झाली. तिथून लॉरेन्स बिश्नोई छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पुढे येऊ लागला. 2010 पासूनच खंडणी, हाणामाऱ्या या सारख्या गुन्हांमध्ये त्याचं नाव येऊ लागलं. 2013 ला मात्र त्यांच्यावर गंभीर गुन्गा दाखल झाला. विद्यार्थी राजकारणातील प्रतिस्पर्ध्याती लॉरेन्सने हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणात त्याला अटक झाली. अद्यापही तो गुजरातच्या जेलमध्ये आहे.