Ajit Pawar: हे सरकार पावसाळी अधिवेशनच घेत नाही; तुम्हाला अडवलय कोणी; शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांनी फटकारले
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.
मुंबईः राज्यातील एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडखोरी नाट्यानंतर राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन 27 दिवस होऊनही मंत्रि मंडळाचा विस्तार नाही की, अजून पावसाळी अधिवेशन घेतले गेले नाही त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी दिल्ली दौऱ्यासह मंत्रि मंडळ विस्तार, पावसामुळे झालेलं नुकसान, भरलेली धऱणं याबाबतही अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणीही अजित पवार यांनी केली.
हे सरकार अधिवेशन घेत नाही
यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, आम्ही 18 जुलै रोजी अधिवेशनाची तारीख नक्की केली होती मात्र राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर 25 जुलै रोजी अधिवेशन घेऊ असंही सांगितलं होतं मात्र अजूनही हे सरकार अधिवेशन घेत नाही. तुम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करण्यापासून कुणी अडवलंय? असा सवालही अजित पवार यांनी केला.
विदर्भ, मराठवाडा आणि राज्यात अतिवृष्टी
तसेच अजित पवार यांनी सांगितले की, आज मी विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. नेहमीच्या एनडीआरएफच्या नियमांनुसार मदत देऊन चालणार नाही तर मागे अनेकदा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सगळे नियम बाजूला ठेवून दुप्पट, तिप्पट मदत केली पाहिजे असंही अजित पवार यांनी सांगितले.