मुंबई : हजारो चाकरमानी हे मुंबई शहरात नोकरीसाठी येतात. ते वसई-विरार, कल्याण, बदलापूर, टिटवाळा, पनवेल अशा उपनगरांमधून मुंबईत नोकरीसाठी येतात. या नोकरदारांसाठी संध्याकाळची वेळ फार महत्त्वाची असते. कारण ते संध्याकाळच्या वेळी आपल्या घरी जाण्यासाठी निघतात. काही जण अपवाद वगळले तर जवळपास सर्वजण लोकल ट्रेनच्या माध्यमातूनच घरी जातात. त्यामुळे हा सर्व नोकरदार वर्ग लोकल ट्रेन सेवेवर विसंबून असतो, म्हणूनच लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पण हीच लाईफलाईन पश्चिम रेल्वे मार्गावर दुपारपासून कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.
पश्चिम रेल्वेची रेल्वे सेवा ही दुपारपासून उशिराने सुरु आहे. सिग्नल यंत्रनेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा खोळंबली आहे. त्यामुळे लोअर परळ रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. दुपारपासूनचं पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. मालाड ते गोरेगाव दरम्यान सिग्नलच्या समस्या असल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर लोकल ट्रेन धीम्या गतीने धावत आहेत. बोरिवली ते चर्चगेट आणि चर्चगेट ते बोरिवली जाणाऱ्या धिम्या लोकल ट्रेन 30 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे.
बोरिवली ते कांदिवली रेल्वे स्थानकामध्ये धिम्या मार्गावर लोकल ट्रेन धिम्या गतीने धावत आहेत. लोकल ट्रेन अतिशय संत गतीने धावत असल्याने प्रवाशी देखील वैतागले आहेत.
लोकल ट्रेन खोळंबल्याने काय त्रास होतो हे प्रत्येक मुंबईकर जाणतो. जो मुंबईकर नेहमी रेल्वेने ये-जा करतो त्याला याबाबतचा जास्त अनुभव असतो. विशेष म्हणजे दुपारपासून पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय. मग रेल्वे प्रशासन इतक्या तासापासून काय करतंय? असा प्रश्न संतप्त प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय.