लोकल वेळेवर धावणार, आता प्रवाशांचा खोळंबा होणार नाही, मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा झाली अपग्रेड !
मध्य रेल्वेच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग ( सिग्नल यंत्रणा ) अपग्रेडेशन पूर्ण झाले असल्याचे मध्ये रेल्वेने आज जाहीर केले आहे. त्यामुळे निदान आता तरी मध्य रेल्वेच्या लोकल वेळेवर धावतील अशी आशा आहे.
मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या फलाटाची लांबी वाढविण्याचे काम झाल्यानंतर सिग्नल यंत्रणेतील अपग्रेडेशनचे काम अखेर झाले आहे. त्यामुळे लोकल गाड्यांच्या वेगावर घातलेले निर्बंध आता काढण्यात आले आहेत. मध्य रेल्वेवर गेल्या 30 आणि 31 जूनला जोडून आलेल्या विकेण्डला 63 तासांचा महा जम्बो ब्लॉक घेतला होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक 9 आणि 10 ची लांबी 24 डब्यांची करण्यात आली आहे. तसेच ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढविण्यात आली आहे. लांबपल्ल्याच्या फलाटांची लांबी वाढविल्यानंतर सिग्नल यंत्रणेतील अपग्रेडशनमधील काही कामे राहीली होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकलच्या वेगावर निर्बंध आल्याने तसेच सिग्नल यंत्रणेतील अपग्रेडेशन व्हायचे असल्याने रोजच्या उशीरा धावणाऱ्या लोकलचा फटका प्रवाशांना बसत होता. परंतू मध्य रेल्वेने सिग्नल अपग्रेडेशनचे काम संपल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांचा रोजचा खोळंबा टळणार असल्याचे म्हटले जात आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात लांबपल्ल्याच्या फलाट क्रमांक 9 आणि 10 ची लांबी वाढविल्यानंतर 1 जून रोजी नवीन सिग्नलिंग सिस्टीम लागू केली होती. परंतू त्यात व्यवस्थित अपग्रेडेशन झाले नव्हते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या अनेक लोकल पंधरवडाभर रखडल्या होत्या आणि प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत होता. आता मध्य रेल्वेच्या सिग्नल अपग्रेडेशनचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजूरीनंतर, आम्ही सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत, त्यामुळे आधीच्या 250 मीटर नियमाऐवजी आता ट्रेनने 70 मीटर अंतर ओलांडल्यानंतर पुढील ट्रेनला मंजुरी मिळणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या लोकल वेळेवर धावेल
क्रॉसओव्हर्सवर लोकल ट्रेनना 15 किमी/ प्रति तास वेगाची मर्यादा होती. ही वेग मर्यादा आता सिग्नल यंत्रणेतील अपग्रेडेशन पूर्ण झाल्यानंतर संपूर्णपणे हटविण्यात आली आहे. त्यामुळे आता लोकल ट्रेन नेहमीच्या वेगाने धावू शकणार आहेत असे म्हटले जात आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींगचे काम झाल्याने किमान या कारणाने तरी लोकल ट्रेन उशीरा धावणार नाहीत. सिग्नल, OHE, किंवा ट्रॅकशी संबंधित काही बिघाड किंवा उपनगरातून लोकल उशीरा पोहचणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे उशीरा आगमन होणे यामुळे लोकल ट्रेन लेट होऊ शकतात असे एका अधिकाऱ्याने सांगितले.