INDIA आघाडीच्या मंचावर हिंदू शब्द का वापरत नाही? उद्धव ठाकरेंचं उत्तर काय
Uddhav Thackeray on Hindu : उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या मंचावरुन हिंदू शब्द वापरत नसल्यावरुन महायुतीने रान पेटवले आहे. मुंबईत इंडिया आघाडीची पत्रकार परिषद झाली. उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नाला आणि विरोधकांच्या आरोपाला असे सडेतोड उत्तर दिले.
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील मते खेचून आणण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा धुराळा संपण्यापूर्वी दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान हल्लाबोल केला. इंडिया आघाडीने प्रचाराच्या सांगतेपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात उद्धव ठाकरे यांना ते इंडिया आघाडीच्या मंचावर हिंदू शब्द का वापरत नाहीत, असा सवाल विचारण्यात आला. महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन त्यांना लक्ष केले. मुस्लीम मतांच्या लांगुलचालनासाठी ठाकरेंनी हिंदू शब्दा तिलांजली दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी असे सडेतोड उत्तर दिले.
ते तर बेअकली
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दोन टप्प्यांपासून महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. दोन्ही वेळेस त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा नकली मुलगा असल्याची विखारी टीका त्यांनी केली होती. ते बाळासाहेबांच्या विचारांचे वारस नसल्याचा घणाघात केला होता. त्यावर आज उद्धव ठाकरे यांनी टीकेने उत्तर दिले. मी तर नकली नाही पण ते तर बेअकली आहेत, अशी जहाल टीका त्यांनी मोदींवर केली.
‘हिंदू’ शब्द का वापरत नाहीत
- उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात, ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातोंनो’ अशी होत होती. पण गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या मंचावर त्यांनी हिंदू ऐवजी देशभक्तांनो असा शब्द योजला आहे. त्यावरून महायुतीने रान पेटवले आहे. याविषयीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.
- “जे लोकं देशभक्त या शब्दावर आक्षेप घेत आहेत, ते एकतर हिंदू नसतील अथवा देशभक्त नसतील. कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला. देशभक्त असणं हा काय गुन्हा आहे का? याचा अर्थ असा की आमच्यावरती जे पाकिस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करत आहेत, ते खरे देशद्रोही आहेत. मी देशभक्त हा शब्द वापरल्याने ज्यांना आक्षेप आहे, ते पण देशद्रोही आहेत. ते हिंदू असतील असे मला वाटत नाही. या देशातील आम्ही सर्व हिंदू हे देशभक्तच आहोत. देशभक्तांमध्ये सर्वच आहेत. मुसलमान सुद्धा आहेत. ख्रिश्चन, शिख आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आरजक म्हणाणारे हे देशभक्त असतील असे मला वाटत नाही. ” असा उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले.