मिस्टर मोदी बारामतीत येऊन दोन दिवस राहावं आणि…; संजय राऊत यांचं आव्हान काय?
Sanjay Raut on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तळ ठोकल्यानंतर राज्यातील निवडणूक मोदी विरुद्ध शरद पवार अशा बाजूने झुकली. पवारांवर मोदींनी हल्लाबोल केला तर पवारांनी पण त्यांच्यावर पलटवार केला. महाविकास आघाडीने मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. आता संजय राऊत यांनी या तोफगोळ्यांचा मोर्चा सांभाळला आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक ज्वलंत मुद्दे आता हद्दपार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात तळ ठोकल्यानंतर पवार-मोदी असा सामना निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. पंतप्रधानांनी शरद पवार यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. त्याला पवारांनी सडेतोड उत्तर दिले. महाविकास आघडीने पण मोदींवर जोरदार प्रहार केला. आता खासदार संजय राऊत यांनी पण मोदींवर तोफ डागली आहे. मोदींच्या आरोपांना पवारांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
मिस्टर मोदी बारामतीत या
मोदींनी शरद पवार यांच्यावर कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार, अशी टीका केली होती. त्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मिस्टर मोदींनी दोन दिवस बारामतीत येऊन राहावं आणि अभ्यास करावा. कुटुंबाकडे फार सकारात्मक दृष्टीने पहावं आणि मग स्वतःचा कुटुंबा कुठे आहे हे शोधावं, असा टोला राऊतांनी मोदींना हाणला.
त्यांचा कुठं कुटुंबाशी संबंध
शरद पवारांचा कुटुंब हे मजबूत एक संघ आहे तुम्ही एका दुसऱ्या माणूस त्यांच्या कुटुंबात दहशतीच्या बळावर फोडला असेल तुरुंगाचे भय दाखवून आणि तो पळून गेला असेल याचा अर्थ कुटुंब फुटला असं नाही.पवारांचं कुटुंब म्हणजे फक्त पवार कुटुंब नाही पुऱ्या महाराष्ट्रातील अनेक घर हे त्यांचे कुटुंब आहेत. ठाकरे परिवारातील आम्ही सगळे एक कुटुंब आहोत हे त्यांना नरेंद्र मोदी यांना कळणार नाही कारण त्यांचा कुठं कुटुंबाशी संबंध आला, अशी खोचक टीका राऊतांनी केली.
मोदी खिडकीतून डोकावत आहेत
मोदी हे वारंवार आमच्याकडे खिडकीतून डोकावून पाहत आहेत आणि त्यातच कळत आहे. देशातील निकाल कोणत्या दिशेने चालला आहे. पण मोदींनी कितीही डोळे मारले, खुणावलं खिडकीतून गच्चीवरून फटीतून दारातून पायरीवरून तरी महाविकास आघाडीतला कोणताही घटक हा कोणत्याही आमिषाला दहशतीला बळी पडणार नाही. शरद पवार -ठाकरेंची मदत घ्याची वेळ मोदींवर येऊ नये, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.