मोदींच्या रोड शोवर किती कोटी खर्च? कुणी केला खर्च?, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
Sanjay Raut On PM Modi : संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींच्या रोड शोसाठी निधी कुठून आला, त्यांच्या रोड शोचा खर्च कुणी केला, याविषयीचा गौप्यस्फोट राऊतांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता वातावरण तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यात मुंबईत डेरेदाखल होते. त्यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. त्यापूर्वी त्यांनी रोड शो करुन शक्ती प्रदर्शन केले. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर सणसणीत टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या रोड शोसाठी कोट्यवधींचा निधी कुठून आला? त्यांच्या रोड शोसाठी कुणी खर्च केला? असा सवाल करत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पाण्यासारखा पैसा वाटला
संजय राऊत यांनी महायुतीवर घणाघाती टीका केली. त्यांनी पाण्यासारखा पैसा वाटल्याचे आरोप केला. भारतीय जनता पार्टी, मिंधे गट, अजित पवारांचा गट, त्यांच मुख्य हत्यार या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच आहे, असा आरोप त्यांनी केला. अजित पवारांनी बारामती मध्ये कसे पैसे वाटले हे बघितलं आणि 12 वाजेपर्यंत बँका चालू ठेवल्या हे समोर आल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून 19 पैशांच्या बॅग कशा उतरल्या ते मी दाखवल्या त्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये त्यांनी पोचवले आहेत. पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप होत आहे, असा आरोप राऊतांनी महायुतीवर केल.
मोदींच्या रोड शोला कुणाचा पैसा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांपूर्वी मुंबईत होते. काल ही ते मुंबईत होते. त्यांनी रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा प्रायव्हेट कार्यक्रम प्रचाराचा कार्यक्रम होता. त्यांच्यासोबत असलेल्या मिंधे आणि अजित पवार गटाचा होता. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा खर्च त्यांच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. भाजपाच्या पैशातून व्हायला पाहिजे होता. परंतु जो पैसा खर्च झाला तो पैसा मुंबई महानगरपालिकेने खर्च केल्याचा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
इतके कोटी केले खर्च
मोदी यांच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेने 3 कोटी 56 लाख रुपये खर्च केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याचे ते म्हणाले. याप्रकरणी मोदींवर गुन्हा दाखल व्हायला हवा, असे ते म्हणाले. मुंबईकरांना वेठीस धरायचं, मुंबईकरांच्या खिशावरती भार टाकायचा. भारतीय जनता पार्टीकडून हा पैसा वसूल केला पाहिजे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार
कोरोना काळात इंजेक्शनचा बेकादेशीर साठा पकडला. काळाबाजार करण्यासाठी भाजपने तेव्हा त्या ठिकाणी आणलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करत होते. देवेंद्र फडणवीस चोरीच्या मालाला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी येतात, ते चोरांचे सरदार आहेत, असा आरोप राऊतांनी केला.