Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाविकास आघाडीमध्ये या पाच जागांवर दोस्तीत कुस्ती, पाहा व्हिडीओ
महाविकास आघाडीत 5 जागांवरुन काँग्रेसची अडचण झालीय. त्यामुळंच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत 4 ठिकाणी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एका ठिकाणी दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 5 जागांवर मैत्री पूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार असून दिल्लीतल्या हायकमांडमधून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे.
राज्यातील सांगली, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 5 जागांवर काँग्रेसला लढायचं आहे. सांगलीतून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केलीय, इथं काँग्रेसकडून विशाल पाटील संभाव्य उमेदवार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतही ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केला.इथं ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर उमेदवार आहेत. काँग्रेसकडून संजय निरुपम स्पर्धेत आहेत उत्तर पूर्व मुंबईतून ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना उमेदवारी दिलाय.
दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेचे उमेदवार आहेत अनिल देसाई, इथून काँग्रेसला वर्षा गायकवाडांना उमेदवारी द्यायची आहे. भिवंडीची जागा काँग्रेसचीच आहे. मात्र या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय. इथून काँग्रेसकडून दयानंद चोरघे इच्छुक असून ते दिल्लीत काँग्रेस हायकमांडच्या भेटीला गेलेत. त्यामुळं या 5 जागांवर तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीच्या मूडमध्ये काँग्रेस असल्याचं कळतंय.
31 तारखेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींसोबत बैठक आहे. त्यानंतर 3 एप्रिलला मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्याआधी दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस 5 जागांचा मुद्दा उपस्थित करणार मात्र जागा वाटप झालं असून आता पुन्हा चर्चा नाही असं राऊत म्हणालेत. 31 तारखेच्या ठाकरे पवार आणि काँग्रेस हायकमांडच्या भेटीआधी भिवंडीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे दिल्लीत दाखल झालेत. हायकमांडनं सांगितल्या मीही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचं चोरघे म्हणालेत.
पाहा व्हिडीओः-
उद्धव ठाकरेंनी 17 जणांची पहिली यादी जाहीर केल्या केल्याच काँग्रेसनं आक्षेप घेतला. ज्या जागांवर अंतिम चर्चा झालीच नाही. त्यावरुन उमेदवार जाहीर का केला? असा सवाल करत पटोले, थोरातांपासून पृथ्वीराज चव्हाणांनीही ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करुन दिली. आता दिल्लीत 31मार्चला तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत होणार?, हे 2 दिवसांतच स्पष्ट होईल.