Loksabha Election 2024 : सुप्रिया सुळेंना यंदाची लोकसभा जड जाणार? पवारांच्या बालेकिल्ल्यात ‘खेला होबे’ ??
भाजपने 2019 पासूनच लोकसभेसाठी मिशन 45+ चा नारा दिलाय. भाजपच्या याच मिशनमधील प्रमुख असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघावर देखील याचा मोठा परिणाम होणार हे स्पष्ट आहे.
ईशान गोखले, प्रतिनिधी TV9 Marathi मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपची साथ देत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेत सहभाग घेतला. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून 40 आमदार घेऊन बाहेर पडल्याने मविआ सरकार कोसळलं होतं. आता 2023 मध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने मविआतच फूट पडल्याचं पहायला मिळालं. पण 2022 मधील शिंदेंचं बंड असेल किंवा 2023 चं अजित पवारांचं, यामुळे राज्यातल्या अनेक मोठ्या राजकीय समीकरणांमध्ये फरक पडणार आहे. भाजपने 2019 पासूनच लोकसभेसाठी मिशन 45+ चा नारा दिलाय. भाजपच्या याच मिशनमधील प्रमुख असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघावर देखील याचा मोठा परिणाम होणार हे स्पष्ट आहे.
‘मिशन 45.. आणि मिशन बारामती’
2019 मध्ये राज्यात सर्वाधिक जागा जिंकत भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. मात्र भाजप सेना युती तुटल्याने आणि मविआच्या निर्मितीमुळे भाजपला 2022 जून पर्यंत विरोधी बाकावरच बसायला लागलं. या काळातच भाजपकडून 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी तयारी सुरू करण्यात आली होती. सध्या राज्यात भाजपचे 22 खासदार आहेत. तसेच 2019 ला शिवसेना भाजप युतीत शिवसेनेकडून 18 खासदार निवडून आलेले त्यातील 13 ते 15 खासदार सध्या शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. 2022 ला शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजपच्या या मिशन 45 च्या नाऱ्याचा जोर आणखी वाढू लागला. त्यातच आता अजित पवारांच्या सत्तेत सगभागी होण्यानं भाजप आता 45 वरून मिशन 48 चा नारा देऊ लागलंय. ’45 जागा तर जिंकणारच होतो मात्र अजित पवारांच्या येण्याने बारामती देखील जिंकू’ असं विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं.
‘मिशन बारामती’ यशस्वी होणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचा कायमच बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची ओळक आहे. शरद पवार तब्बल 6 वेळा तर अजित पवार 1 वेळा याच मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी 2009, 2014 आणि 2019 अशा तीन निवडणुका जिंकत विजयाची हॅटट्रिक साधली होती. त्यामुळे या बारामती लोकसभा मतदारसंघात 25 वर्षांहून अधिक काळ पवार कुटुंबाचा दबदबा राहिलाय. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यात बारामती, इंदापूर, दौंड, खडकवासला, पुरंदर आणि भोर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी पक्षाचे 2-2 आमदार आहेत.
खडकवासल्यात भीमराव तापकीर आणि दौंडमध्ये राहुल कुल हे भाजपचे दोनच आमदार आहेत. मात्र अजित पवारांच्या बंडामुळे आता खुद्द बारामतीचे आमदार अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे दोन्ही आमदार आता भाजपसोबत सत्तेत समील झाले आहेत. 2014 पासूनच भाजपला बारामती लोकसभा मतदार संघ जिंकण्याची स्वप्ने पडत आहेत. 2014 ते 2019 च्या काळात भाजपने एकेकाळचे काँग्रेस धडाडीचे नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन बारामती जिंकण्यासाठी पहिला डाव टाकला. तसेच याच 5 वर्षांच्या काळात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपने आपल्याकडे खेचले. काहीच दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मानले जाणरे पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे देखील भाजपवासी झाले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर देखील खडकवासला मतदारसंघातून आमदार होण्यासाठी इच्छूक आहेत. हा मतदारसंघ 2011 पासून भाजपकडे आहे. पुणे महापालिकेचा मोठा भाग या मतदारसंघात येत आसल्याने असून लोकसभेच्यावेळेस भाजप याच मतदारसंघातून सर्वाधित मतदान मिळवतं. याच मतदारसंघातून रूपाली चाकणकर यांनीही आपल्या राजकारणाला सुरूवात केली होती. त्यामुळे या मिशन बारामती साठी रूपाली चाकणकर देखील भाजपच्याच फायद्याच्या ठरतील.
राष्ट्रवादीच्या विरोधात राजकारण करत जे आमदार आणि मंत्री झाले असे विजय शिवतारे देखील आज भाजपसोबत सत्तेत आहेत. ते जरी आमदार नसे तरी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसैनिकांची मोठी फौज त्यांच्याकडे असल्याचं बोललं जातं. तसेच 2019 ला अजित पवारांच्या विरोधात गेल्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचंही अनेकांना ठाऊक आहे. अजित पवारांनी शपथ घेतलेल्याच दिवशीच शिवतारेंनी दादांची भेट घेतली होती.
शिवतारे देखील बारामती लोकसभेसाठी भाजपच्याच मदतीत कामाला लागणार हे ही जवळपास निश्चित आहे. तसेच अनेक काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे सरकार येताच शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी एकत्र ताकद जर लोकसभेसाठी वापरली गेली तर भाजपसाठी ‘मिशन बारामती’ तितकं अवघड नसणार आहे.
या बड्या नेत्यांमुळे भाजपला ‘मिशन बारामती’ सहज शक्य
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ला खासदार सुप्रिया सुळेंनी 6 लाख 86 हजार 714 मतं मिळवली होती. तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 मत मिळाली होती. यात सुप्रिया सुळेंचा तब्बल 1 लाख 55 हजार 774 मतांनी विजय झाला होता.
2014 च्या लोकसभा निवडणूकीत मात्र सुप्रिया सुळेंना मतं 5 लाख 21 हजार 562 तर रासपच्या महादेव जानकरांना 4 लाख 51 हजार 843 मतं मिळाली होती. यावेळेस सुप्रिया सुळेंचा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 69 हजार 719 मतांनी विजय झाला होता. याच वेळेस जानकर यांनी ही निवडणूक कप बशीच्या चिन्हावर लढवली होती. ती कमळ या चिन्हावर लढवली असती तर सुप्रिया सुळेंचा 2014मध्येच पराभव झाला असता, असा दबक्या आवाजात सूर आजही भाजपचे स्थानिक कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतो. आता मात्र शिंदे आणि अजित पवारांच्या बंडानंतर भाजपच्या या मिशन बारामतीसाठी काही चेहरे निर्णायक ठरणार आहेत.
बारामती – अजित पवार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) इंदापूर – दत्तात्रय भरणे (अजित पवार गट), हर्षवर्धन पाटील (भाजप) खडकवासला- भीमराव तापकीर(भाजप), रूपाली चाकणकर (अजित पवार गट) दौंड – राहुल कुल (भाजप) भोर – विक्रम खुटवट (तटस्थ), रणजित शिवतरे (तटस्थ), चंद्रकांत बाठे (तटस्थ), जीवन कोंडे (भाजप) पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना-शिंदे गट), अशोक टेकवडे (भाजप)