अक्षय मंकणी, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 5 मार्च 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाबाबत तिढा जवळपास संपण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची आता जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा कधी सुटेल? असा प्रश्न होता. कारण तीनही सत्ताधारी पक्षांकडून वेगवेगळा दावा केला जात होता. अखेर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: महाराष्ट्रात आले आहेत. अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. अमित शाह यांची अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर आज रात्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार यांच्या गटाचा जवळपास दहा जागांवर दावा असल्याची माहिती आहे. अजित पवार आजच्या बैठकीत अमित शाह यांना कोणकोणत्या जागा हव्या आहेत, याबाबत माहिती देणार आहेत. तसेच अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत. त्यानंतर अंतिम जागावाटप ठरणाक आहे. विशेष म्हणजे या जागावाटपावर उद्याच शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांची आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सुरु होणार आहे. या बैठकीत अजित पवार इच्छुक असलेल्या जागांबाबत अमित शाह यांना माहिती देणार आहेत. अमित शाह आजच्या बैठकीनंतर उद्यादेखील महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. यावेळी जागावाटपाचा अंतिम फैसला केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही आहे. रायगड, बारामती, सातारा, शिरुर जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. त्यांनी धाराशिव, परभणी जागेवरही दावा केलाय. सध्या या दोन्ही जागांवर ठाकरे गटाचे खासदार आहेत. शिंदे गटाकडील बुलढाणा आणि हिंगोलीच्या जागांवरही अजित पवार गट इच्छुक आहे. तसेच भाजपाजवळील गडचिरोली, माढा जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. अजित पवार एकूण 10 जागांवर आग्रही आहे. पण एकूण 17 जागांवर बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भंडारा-गोंदिया, नाशिक, दिंडोरी, मुंबई उत्तर पूर्व, ईशान्य मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर जागांवरही अजित पवार गट चर्चा करणार आहे.