महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता. यंदाच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. अशातच महाविकास आघाडीकडून वारंवार ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि फडणवीस सरकारमध्ये पशुपालन मंत्री राहिलेले महादेव जानकर यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसंच ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. तसंच स्वपक्षातील आमदार रत्नाकर गुट्टे यांनाही जानकरांनी इशारा दिला आहे.
अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळं महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळं माहीत आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.
महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडत एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यावर बोलताना मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यापासून दूर आहे. काँग्रेसला अजून चाखल नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे, असं महादेव जानकर म्हणालेत.
रत्नाकर गुट्टे हा माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू.मी सगळ्या गोष्टी च्या ठेचा लागल्या आहेत. त्यामुळं मी सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळं माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही, असं म्हणत महादेव जानकर यांनी गंगाखेडच्या आपल्याच पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना इशारा दिला आहे.