मुंबई: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अनेक लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल होतात. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अनेक कार्यक्रमही पार पडत असतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करु नका, असं आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडे यांनी आज चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यावेळी महापालिका आणि चैत्यभूमी सदस्यांशी चर्चा केली. (Mahaparinirvan Day will be telecast live Dhananjay Munde says)
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण केलं जाईल. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अनुयायांना प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील काही अनुयायी आले तर त्यांना चैत्यभूमीवर जाता येणार नाही. अशोकस्तंभाजवळ थांबून त्यांना दर्शन घ्यावं लागेल, असंही मुंडे यांनी सांगितलं. महापालिका आणि पोलिस यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेशही मुंडे यांनी दिले आहेत.
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपुजनाचं प्रक्षेपण ज्याप्रमाणे करण्यात आलं. त्यानुसारच 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यावेळी देशभरातील नागरिक घरी बसून चैत्यभूमीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे या चित्रिकरणाचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात आले आहेत.
इंदूमिल स्मारकाची उंची 100 फुटाने वाढवण्यात आली आहे. हे स्मारक मार्च 2023 पर्यंत तयार होऊन नागरिकांसाठी खुलं करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. स्मारकाचे उद्घाटन होण्यापूर्वी 2 महिने आधीच स्मारक तयार असावे, असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. मार्च 2023 पर्यंत इंदूमिल स्मारक पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं मुंडे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबवण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यापूर्वी दिली आहे. राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशा पद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण 27 ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार : धनंजय मुंडे
बाहेरील प्रेत चैत्यभूमी स्मशानात नको, मनसेचा आंदोलनाचा इशारा
Dhananjay Munde on Mahaparinirvan Day