निवडणुकीची रणधुमाळी : मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार; ‘स्वराज्य’ च्या भूमिकेकडेही लक्ष
Mahavikas Aghadi Mahayuti Candidate First List Update : काल राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिल्या यादीबाबतचे अपडेट्स, वाचा सविस्तर...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने काल याबाबतची घोषणा केली. 20 नोव्हेंबर ला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला निकाल लागेल. त्यामुळे आता सगळेच पक्ष तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज महायुतीची आणि महाविकास आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसंच ‘स्वराज्य’ पक्षाची आज पत्रकार परिषद होणार आहे. संभाजीराजे छत्रपती माध्यमांशी संवाद साधणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
महायुतीची पहिली यादी आज?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या घडामोडींना वेग आला आहे. आज महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीचा निवडणुकीचा फॉर्म्युला जाहीर केला जाणार आहे. तसंच उमेदवारांच्या पहिल्या यादीबाबतच लोकांमध्ये उत्सुकता आहे. काल दुपारीच महायुतीची पत्रकार परिषद होती. यातच पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. आता आज सकाळी 11 वाजता महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर होते का? हे पाहावं लागेल.
मविआचं आज जागावाटप?
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. तिन्ही पक्ष मिळून हे जागावाटप जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच उमेदवारांची पहिली यादी देखील आज येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
निवडणूक जाहीर होताच आता घडामोडींना वेग आलाय. राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार असल्याचं बोललं जात आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी तिसरी आघाडी केली आहे. निवडणुकीत या तिसऱ्या आघाडीची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अशातच आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. नाशिकमध्ये सकाळी ९.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती काय भूमिका मांडणार? याकडे सर्वांचंच लक्ष आहे.