“आमचे फिश फूड स्टॉल का बंद केले?” सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली, म्हणाली “लाडकी बहीण…”
या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. सध्या या मतदारसंघात सदा सरवणकर, अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मात्र आज माहीममध्ये प्रचारासाठी गेलेल्या सदा सरवणकरांवर कोळी महिलेने संताप व्यक्त केला.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सदा सरवणकर एका कोळी महिलेशी संवाद साधताना दिसत आहेत. यात ती कोळी महिला माहीममध्ये फिश फूड स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सदा सरवणकरांना प्रश्न विचारत आहेत. मात्र विचारलेल्या प्रश्नांची उत्तर न देता आल्याने ते माघारी परतल्याचे दिसत आहे.
सदा सरवणकर आणि कोळी महिलेचा संवाद काय?
या व्हिडीओत सदा सरवणकर हे त्या कोळी महिलेच्या दारात जाऊन मतदान करण्यास सांगताना दिसत आहेत. त्यात ती महिला सरवणकरांना प्रश्न विचारते.
कोळी महिला : आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. कधी चालू करणार?
सदा सरवणकर : आम्ही लवकरच सुरु करु.
कोळी महिला : आम्ही तुमच्या हातापाया पडून झालं. आमच्या पोटावर आलं आहे. लाडकी बहीण सांगता मग आम्ही कुठली लाडकी बहीण आहोत, ते सांगा आम्हाला?
सदा सरवणकर : आम्ही लवकरच सुरु करु, आपण घरात बसून यावर चर्चा करुया का?
कोळी महिला : घरात नको, तुम्ही बाहेरच राहा.
कोळी बांधव सदा सरवणकरांवर नाराज?
असा संपूर्ण संवाद या व्हिडीओत ऐकायला मिळत आहे. या व्हिडीओत ती कोळी महिला मोठ्या प्रमाणात संतापल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा संताप पाहिल्यावर सदा सरवणकर हे काहीही न बोलता तिथून निघून गेल्याचेही दिसत आहेत. माहीम कोळीवाड्यातून सदा सरवणकरांवर अशाप्रकारे रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे माहीमधील कोळी बांधव हे सदा सरवणकरांवर नाराज आहेत का? अशी चर्चा सध्या रंगली आहे. तसेच या नाराजीचा त्यांना फटका बसणार का? अशाही चर्चा सुरु झाल्या आहेत.