सदा सरवणकर माहीममधून माघार घेणार? मध्यरात्री ‘वर्षा’वरुन आदेश, एकनाथ शिंदेंनी दिले मोठे आश्वासन
आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
Mahim Constituency Sada Sarvankar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. माहीम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर हे माघार घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. त्यातच आता माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना माहीम मतदारसंघातून माघार घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे.
सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज भरणार का?
“तुम्ही उमेदवारी अर्ज तुर्तास मागे घ्या, युती धर्माचे पालन करा. तुमच्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही”, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना दिले. त्यामुळे सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज भरणार का? माहीममधून माघार घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माहीम मतदारसंघात तिहेरी लढत
दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीत ठाकरे गटाकडून महेश सावंत हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.