महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेनेचा आता अंतिम फैसला होणार?
शिवसेना पक्षाचा अंतिम निकाल आता विधानसभेत लागणार आहे. कारण 16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता विधानसभा अध्यक्षांच्या समोर प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. यावेळी दोन्ही बाजूचे आमदार काय-काय भूमिका मांडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई | 9 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता विधानसभेत प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या 16 अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिले आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांची बाजू समजून घेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना आपली लिखित भूमिका मांडण्यासाठी नोटीस पाठवली होती. तसेच यासाठी पुराव्यांची देखील मागणी करण्यात आली होती.
विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला सर्वात आधी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांकडून उत्तर दाखल करण्यात आलं होतं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य करत वेळ वाढवून दिला होता. यादरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनीदेखील विधानसभा अध्यक्षांकडे आपली लिखित स्वरुपात भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी विधानसभेत प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याची महत्त्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१४ सप्टेंबरला मॅरेथॉन सुनावणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर आता विधानसभेत प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभेत मॅरेथॉन सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष यादिवशी सुनावणी घेणार आहेत.
या सुनावणीच्या निमित्ताने शिवसेनेचे ५४ आमदार एकाच छताखाली येणार आहेत. वाद आणि प्रतिवाद करणाऱ्या आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी देण्यात येणार आहे. मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील. तसेच एकमेकांना पुराव्याच पेपर सुद्धा देतील. मग विधिमंडळ सर्वाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेच वेगळं इशू फ्रेम करेल. विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
…तर ठाकरे गट पुन्हा कोर्टात जावू शकतं
या प्रकरणी सुनावणी पार पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राहुल नार्वेकर यांच्याकडून या प्रकरणी वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ठाकरे गटाने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धावही घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी काय-काय कारवाई केली, याबाबतची माहिती मागवली होती.
या सर्व घडामोडींनंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीत ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागला तर ठाकरे गट कोर्टाचे दरवाजे पुन्हा ठोठावू शकतं. त्यामुळे संबंधित प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.