मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत (Cabinet Meeting) दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलीय. तर दुसरा मोठा निर्णय म्हणजे कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-3 प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मेट्रो 3 प्रकल्पाची (Metro 3 Project) किंमत तब्बल 10 हजार कोटींनी वाढली आहे. 23 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मधल्या दोन वर्षात कारशेडचा वादामुळे रखडला. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत आता 33 हजार कोटींवर गेल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.
Media interaction https://t.co/j6bSPHrUT7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 10, 2022
फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईच्या मेट्रो 3 प्रकल्पाची जी वाढलेली किंमत आहे त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव आपल्या बैठकीत मांडला होता. आपल्याला कल्पना असेल की 2015 साली 23 हजार कोटी रुपये याची किंमत होती. परंतु मधल्या काळात जवळपास अडीच वर्षे हे काम बंद असल्यासारखंच होतं. त्यामुळे जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पुर्ण करायचा होता. कारशेडवरच्या स्थगितीमुळे तो पुढे गेला आणि आता त्याला 10 हजार कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आली आहे. 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आता ढोबळमानाने 33 हजार कोटी रुपयांचा झालाय. त्याला मान्यता देण्यात आलीय. याठिकाणी स्थापत्य कामं 85 टक्के पूर्ण झाली आहेत. इतर सगळी कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. पण कारडेपोचं काम केवळ 29 टक्केच पूर्ण झालं आहे. त्यामुळे हे काम आता वेगानं करुन याचा पहिला फेज कुठल्याही परिस्थितीत 2023 साली सुरु झाला पाहिजे, अशाप्रकारचं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी दिलीय.
महत्वाची बाब म्हणजे हा जो काही वाढीव खर्च आहे त्यात महाराष्ट्र सरकारवर इक्विटीच्या 50 टक्के खर्च देण्याची जबाबदारी आहे, 50 टक्के इक्विटीचे पैसे केंद्र सरकार देणार आहे आणि उरलेले पैसे जायका देणार आहे, वाढीव पैसे देण्यासही जायकाने तयारी दाखवलीय. त्यामुळे आता अतिशय वेगाने हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करु, साधारणपणे हा ज्यावेळी सुरु होईल तेव्हा 13 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. 6 लाख वाहनांच्या ट्रिप रस्त्यावरुन कमी होतील. 2031 पर्यंत 17 लाख लोक प्रति दिन यातून प्रवास करतील. त्यामुळे या प्रकल्पातून मुंबईसाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असा दावाही फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केलाय.