Maharashtra Corona | देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात, नागपुरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. (Maharashtra Corona Cases)
मुंबई : अनलॉकनंतर वाढलेली गर्दी, ठिकठिकाणी होणारा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क लोकलमध्ये वावर यांसह इतर कारणांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा विस्फोट पाहायला मिळत आहे. रुग्णांचा चढता आलेख पाहून राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे राज्य सरकारकडून ठिकठिकाणी निर्बंध लावले जात आहेत. (Maharashtra Corona Cases Lockdown Update News)
?राज्याची कोरोना स्थिती काय?
राज्यात काल दिवसभरात (daily corona update) कोरोनाचे तब्बल 25 हजार 681 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21 लाख 89 हजार 965 इतकी झाली आहे. तर काल राज्यात कोरोनामुळे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 53 हजार 208 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात एकूण 14 हजार 400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहे. राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारीही संख्या ठेवा, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, अशी सूचना देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना
- राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा
- नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी
- आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
- सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
- धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही
?मुंबईत कोरोनाचा कहर
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुंबईमध्ये काल दिवसभरात 3063 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 लाख 55 हजार 914 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 11569 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या होणार आहेत. मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानतंरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे.
?पुण्यातील कोरोना स्थिती
पुणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 2872 नवे कोरोना रुग्ण आढळले. पुण्यात दिवसभरात एकूण 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या पुण्यात 499 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात दिवसभरात 808 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला.
पुण्यात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 229383 वर पोहोचला आहे. काल आढळलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांना मिळून पुण्यात एकूण 18888 रुग्णांवर उपचार सुरु आहे. पुण्यात मृतांचा आकडा 5016 वर पोहोचला आहे. हा आकडा चिंताजनक असल्याचे म्हटले जाते आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पुण्यात आढळले आहे. देशातील 13 टक्के कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. गेल्या महिन्याभरापासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात पुण्यातील आतापर्यंतचा सर्वांत कमी मृत्यूदर हा पुण्याचा आहे.
देशात सद्यःस्थितीत 2 लाख 68 हजार 805 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 62 टक्के म्हणजे 1 लाख 66 हजार 353 कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या खालोखाल केरळमध्ये 9.4 टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत. देशाच्या तुलनेत 13 टक्के आणि राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 21 टक्के (35 हजार 539) कोरोना रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत.
?पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त
पुण्यात गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. पुण्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याने धास्तावलेल्या पालिकेने आता पुन्हा आपली यंत्रणा बाजारपेठांमध्ये उतरवली आहे. त्यामुळे तेथील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात दुकाने, हॉटेल, मॉल व अन्य गर्दीच्या ठिकाणी महापालिकेसह पोलिसांची गस्त राहणार आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यापासून मास्क नसलेल्यांवर कारवाई केली जाणार आहे.
तसेच पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन करीत आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपायांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांपासून त्यांच्याकडील आरोग्य खात्याची टीम पूर्णवेळ काम करणार आहे. (Maharashtra Corona Cases Lockdown Update News)
पुण्यात काय सुरु, काय बंद?
पुण्यात लॉकडाऊन नाही
पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
उद्यान एकवेळ बंद राहणार
?नागपुरात कोरोनाची धडकी भरविणारी स्थिती
नागपुरात कोरोनाची धडकी भरविणारी स्थिती पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये गेल्या 24 तास 35 मृत्यू झाल्याने आणखी चिंता वाढली आहे. या वर्षातील मृत्यूचा हा उच्चांक आहे. तर काल दिवसभरात नागपुरात 3235 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात नागपुरात 16 हजार o66 चाचण्या करण्यात आल्या होत्या. नागपुरातील बरे होणाऱ्यांचे प्रमाण 83.78 एवढे टक्के आहे. सद्यस्थितीत नागपुरात अॅक्टिव्ह रुग्ण 25 हजार 569 एवढे आहेत.
याच पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आज कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेणार आहे. यावेळी ते सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक करणार आहे. या बैठकीत नागपुरात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्येचा आढावा घेतला जाणारआहे. तसेच नागपुरात 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र आता ते वाढणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
?औरंगाबाद दोन दिवस कडक लॉकडाऊन
औरंगाबाद मनपा क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या 13 हजारांच्या पुढे गेली आहे. काल येथे दिवसभरात 1313 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आजचे रुग्ण मिळून औरंगाबाद मनपा क्षेत्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 47 हजार 487 वर पोहोचला आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 960 जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेत आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवार आणि रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन राहणार आहे. औरंगाबाद शहरात आठवड्यातून दोन दिवस लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. त्यानुसार आज आणि उद्या बाजारपेठेसह सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच जीवनावश्यक व्यवहार वगळता औरंगाबाद शहर कडकडीत बंद राहणार आहे.
?सोलापुरात कोरोनामुळे मृत्यूचे सत्र सुरु
सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूच सत्र सुरु आहेत. सोलापूर शहरातील एक तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे 279 नवीन रुग्ण आढळले आहेत. सोलापूर शहरात 916 चाचण्यांमधून 130 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ग्रामीण भागात 3694 चाचण्यांमधून 149 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 205 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
?सोलापूर महापालिकेत नागरिकांना प्रवेश बंद
सोलापूर महापालिकेत नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नागरिकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. सोमवारपासून सर्व नागरिकांना पालिकेत प्रवेश बंद असणार आहे. सोलापुरातील नगरसेवक, अधिकारी, पत्रकार यांच्या शिवाय इतर नागरिकांना प्रवेश मिळणार नाही. तसेच ज्यांनी निवेदन, तक्रारी अर्ज असेल तर ऑनलाईन किंवा महापालिका प्रवेशद्वारासमोर स्वीकारून त्याचे निराकरण केले जाणार आहे.
त्याशिवाय सोलापूर शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी यांना रॅपिड अँटिजेन टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुढील सात दिवसांच्या आत तपासण्या करुन घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा मंडईत बसता येणार नाही, असा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे. तर जिल्ह्याच्या सीमावर आठ तालुक्यात नव्याने तपासणी नाके करण्यात येणार आहेत. (Maharashtra Corona Cases Lockdown Update News)
?सांगलीत कोरोनाचा धोका वाढला
सांगलीत कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या 15 दिवसात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोलापूर लक्षात न येणारी नवीन लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे येत्या एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
सांगली जिल्ह्यात दिवसात तिप्पट वाढ पाहायला मिळत आहे. सांगलीत 186 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगली मनपा क्षेत्रात 59 बाधित रुग्ण आढळले आहे. यात जत आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येत वाढ पाहायला मिळत आहे.
?परभणीत नाईट कर्फ्यू
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणीत रात्री संचारबंदी लावण्यात आली आहे. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रात्री संचारबंदी लावण्याचे आदेश दिले आहेत. परभणीत 19 ते 25 मार्च या काळात संध्याकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. या काळात अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत.
?मीरा भाईंदरमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 मार्चपर्यंत मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असणार आहे. 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मीरा भाईंदर क्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर हा नियम लागू नसेल.
हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट क्षेत्राबाहर सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, बार, हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी ठिकाण्याच्या सेवा 50% क्षमतेसह सुर राहतील. तसेच, मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री 11.00 वाजेपर्यंतच सुरू राहतील. (Maharashtra Corona Cases Lockdown Update News)
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या