राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर, कृषी, उद्योग क्षेत्रात घट, दरडोई उत्पन्न जैसे थे!
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगाणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचं या अहवालात नमूद आहे.
मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra economic survey 2018-19) सादर करण्यात आला आहे. दरडोई उत्पादनात कर्नाटक, तेलंगाणानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर कायम असल्याचं या अहवालात नमूद आहे. तर गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील कृषी उत्पादनात 8 टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या 2018-19 च्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे.
कृषी उत्पन्नात घट
कृषी आणि त्याशी संलग्न क्षेत्रात 2.7 टक्क्यांची अपेक्षित असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद आहे. मागील वर्षी हा दर 3.1 टक्के होता, त्यात यंदा घट होऊन तो 0.4 टक्क्यापर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
उद्योग क्षेत्रातही घट
एकीकडे कृषी घट असताना, दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही घट पाहायला मिळत आहे. उद्योग क्षेत्रात 0.7 टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
दरडोई उत्पन्नात तिसरा नंबर कायम
महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे देशातील दरडोई उत्पन्नाच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक कायम आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 827 रुपये आहे. यामुळे राज्याचा विकासदर गेल्यावर्षी इतकाच म्हणजे 7.5 टक्के इतकाच राहणार आहे.
दरडोई उत्पन्नात कर्नाटक पहिल्या तर तेलंगणा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न 2 लाख 7 हजार 062 रुपये आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरील तेलंगाणाचे दरडोई उत्पन्न 2 लाख 06 हजार 107 रुपये आहे.