Maharashtra Exit Poll 2024 : बारामतीकरांची लेकीला की सुनेला पसंती? पोलमध्ये धक्कादायक निकाल समोर
देशातील लोकसभा निवडणुकांचा एक्झिट पोल समोर आला असून बारामती मतदारसंघाची जागा कोणाकडे जात आहे? याची उत्सुकता सर्व राज्यासह देशाला लागली आहे. टीव्ही 9 मराठीच्या पोलस्ट्राटमध्ये काय सांगितलं आहे जाणून घ्या.
देशातील लोकसभा निवडणुकीचं अंतिम टप्प्यातील मतदान पार पाडलं आहे. मतदान झाल्यावर देशभरातील निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. यामधील राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेल्या हाय व्होल्टेज बारामती मतदारसंघामधून चकीत करणारी एक्झिट पोल करणारी आकडेवारी समोर आली आहेत. Tv9 च्या पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचं चित्र दर्शवलं आहे. राज्यात पाच जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असं पोलमध्ये दाखवलं आहे.
शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने होत्या. पवारांच्या घरातील सदस्य प्रथमच खासदारकीला एकमेकांविरोधात उभे होते. मात्र टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागा तर महायुतीला 22 जागा मिळणार आहेत.
महायुतीच्या 22 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 18 त्यापाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 4 जागा मिळणार असल्याचं दाखवत आहे. मात्र पाच जागा लढवणाऱ्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचं पोलमध्ये दाखवत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांसाठी हे धक्कादायक आहे. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजय मिळवणार असल्याचं दाखवत आहे.
मविआमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक १४, काँग्रेस ५ आणि शरद पवार गटाला ६ जागा मिळणार असल्याचं पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे महायुतीमध्ये असूनही त्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही. कारण बंड करत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही आपली जादू दाखवता आली नाही.