महाराष्ट्रात 5 डिसेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी …तारीख निश्चित करून भाजपाने एकनाथ शिंदे यांना काय दिला मॅसेज?
Maharashtra Government Formation BJP Eknath Shinde : राज्यात महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवले. भाजपा या विधानसभेत मोठा भाऊ ठरला. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदावरून नाराजी नाट्य तर सुरू नाही ना, अशी शंका येत आहे. दरम्यान महाराष्ट्र भाजपा अध्यक्षांनी एक व्हिडिओ पोस्ट करत एकनाथ शिंदे यांना मोठा मॅसेज दिला आहे.
सत्तेच्या सारीपाटावर गणितांची जुळवाजुळव करताना धक्कातंत्राचा वापर करावा लागतो. त्यात राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपा उजवी आहे. भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. मित्रपक्षासह बहुमताचा आकडा जवळ केला. त्यातच मुख्यमंत्री पदावरून, खाते वाटपावरून मित्र पक्ष नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून गावी आहेत. अशातच भाजपाने राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होईल असे जाहीर केले आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते हा एकनाथ शिंदे यांना थेट मॅसेज आहे. त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय लवकर कळवावा, अशी ही रणनीती असल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे.
प्रतिक्षा संपली, जनतेचे धन्यवाद
‘या ऐतिहासिक शपथ विधीची प्रतिक्षा संपली आहे. आम्ही जनतेला त्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद देतो’, अशी घोषणा बावनकुळे यांनी केली. दिल्ली दरबारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गेले होते. ते परत आल्यानंतर भाजपा आणि शिंदे यांच्यात चर्चा झालेली नाही. त्याच दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांनी ही घोषणा केली आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी आहेत. ते आज मुंबईत परत येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. महायुतीची आज संध्याकाळी बैठक होत आहे. त्यासाठी शिंदे मुंबईत असतील अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री पदावरून नाराजी?
दिल्लीत महाराष्ट्राविषयीच्या आणि मुंबईतील राजकीय घडामोडी जणू थंडावल्या आहेत. त्यातच भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांना थेट मॅसेज दिल्याचे बोलले जात आहेत. हे एक दबावतंत्र असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे यांनी नवीन सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर काम केल्यावर नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद कसं स्वीकरणार? ते योग्य वाटत नसल्याच्या भावना एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील बैठकी दरम्यान व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
आता चेंडू शिंदे यांच्या पारड्यात
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकूण 57 आमदार निवडून आले आहेत. आता महायुती सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याविषयीचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. दिल्लीहून परतल्यानंतर ते तडक दरे या गावी गेल्यापासूनच त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जे महत्त्वपूर्ण भूमिका निभावता येत नसेल तर पुढे काय असा सवाल विचारल्या जात आहे. उपमुख्यमंत्री पद, गृहमंत्री पदसह काही खात्यांवर शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपाने नवीन सरकार कधी स्थापन होणार हे जाहीर करून शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.