विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीला मोठा अडथळा; स्थानिक स्वराज्य संस्थेमुळे पेच वाढला
Maharashtra Legislative Council Election : राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच वाढला आहे. विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य संख्याबळ आहे. त्यात विधानसभा सदस्यांमधून निवडणून द्यावयाच्या ३० सदस्यांचा समावेश आहे. काय आहे नेमका पेच?
राज्यात गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यावरुन मोठी आरडा-ओरड झाली. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य इतर स्थानिक संस्थांचे सदस्य यांना निवडून येण्याची संधी काही मिळालेली नाही. ते निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. या निवडणुका रखडल्याचा फटका आता विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीला बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. विधान परिषदेचे एकूण ७८ सदस्य संख्याबळ आहे. त्यात विधानसभा सदस्यांमधून निवडणून द्यावयाच्या ३० सदस्यांचा समावेश आहे.
विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा पेच
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यांचा कारभार हाकण्यासाठी याठिकाणी प्रशासक नेमण्यात आला आहे. परिणामी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ६ जागांच्या निवडणुकांचा पेच निर्माण झाला आहे. या सहापैकी एक जागा ३१ मे रोजी रिक्त होत आहे, तर उर्वरित ५ आमदारांची मुदत २१ जूनला संपुष्टात येत आहे.
दोन वर्षांपासून जागा प्रलंबित
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून ९ जागा निवडून द्यायच्या आहेत. दोन वर्षांपासून या जागांना काही मुहूर्त लागलेला नाही. राज्यपाल नामनियुक्त जागांना पण उमेदवारांची प्रतिक्षा आहे. नामनियुक्तीच्या १२ जागा पण रिक्तच आहेत. आता या सर्व घडामोडींचा परिणाम विधान परिषदेच्या सदस्य संख्येवर पडणार नाही तर नवलच. विधान परिषदेच्या ७८ जागा आहेत. पण जून नंतर हा आकडा ५१ सदस्यांपर्यंत घसरणार आहे.
किती ठिकाणी प्रशासक
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हाती आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद २८९ पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत. या सर्व ठिकाणी सध्या प्रशासक राज आहे. याविषयीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे समजते.
पदवीधरसाठी भाजपची बैठक
कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. मंत्री रवींद्र चव्हाण याच्या बंगल्यावर ही बैठक होणार आहे.भाजपकडून निरंजन डावखरे पदवीधरसाठी इच्छुक आहेत. कोकणातील सर्व जिल्हाध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार आहे. तर मनसेने अभिजित पानसेंच्या नावाची घोषणा केली आहे. पण भाजप या जागेवर लढण्यासाठी ठाम असल्याचे समोर येत आहे.
कधी होणार निवृत्त
- अनिकेत तटकरे, रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवृत्त ३१ मे २०२४
- नरेंद्र भिकाजी, नाशिक, शिवसेना, निवृत्त २१ जून २०२४
- रामदास आंबटकर, भाजपा, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, निवृत्त २१ जून २०२४
- विप्लव बाजोरीया, परभणी तथा हिंगोली, शिवसेना, निवृत्त २१ जून २०२४
- प्रविण पोटे-पाटील, अमरावती, भाजपा, निवृत्त २१ जून २०२४
- सुरेश धस, उस्मानाबाद लातूर बीड, भाजपा, निवृत्त २१ जून २०२४