Maharashtra Lockdown Again: राज्यात निर्बंध लावायचे की नाही? उद्धव ठाकरे पंतप्रधानांशी चर्चा करणार?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय ठरलं?
जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली.

मुंबई: जगातील अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव होत असल्याने अनेक देशात निर्बंध लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओमिक्रॉनवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यात निर्बंध लावावे की लावू नये? नवी नियमावली काय असेल? यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी असंही ठरलं. त्यामुळे ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी काय नियमावली असावी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच पंतप्रधानांशी बोलणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तब्बल तासभर ही बैठक सुरू होती. नव्या व्हेरियंटबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. या बाबतची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यावेळी सर्वच मंत्र्यांनी नव्या नियमावलीबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्याची सूचना केली. मुख्यमंत्र्यांनीही ही सूचना मान्य केली असून ते लवकरच मोदींशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दुबईप्रमाणेच नियमावली लागू होणार?
दुबईने 13 देशातील येणाऱ्या विमानांबाबत आणि प्रवाशांबाबत जी नियमावली केली आहे. तशाच प्रकरे महाराष्ट्रामध्ये देखील नियमावली असावी याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ही नियमावली तपासून योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
शाळा सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभाग घेणार
दरम्यान, या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत चर्चा झाली नाही. या बाबतचा निर्णय आरोग्य विभागाने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. देशातील कोरोनाची परिस्थिती, ओमिक्रॉनचा संभाव्य धोका आणि बदलते हवामान याचा विचार करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारने येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच ओमिक्रॉनच्या धोक्याची चाहूल लागल्याने आता शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार होणार आहे. येत्या दोन दिवसात हा निर्णय होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 29 November 2021#FastNews #News pic.twitter.com/Vzeo5clbIn
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 29, 2021
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडीतील आणखी चार नेते सोमय्यांच्या रडारवर; लवकरच घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्याचा इशारा
हार्बरवासीयांचाही प्रवास गारेगार होणार, 1 डिसेंबरपासून सीएसएमटी-पनवेल एसी लोकल धावणार