Maharashtra Lockdown : पवित्र रमजान महिन्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यंदा 14 एप्रिल ते 13 मे 2021 पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. (State government guidelines for the holy month of Ramajan for Muslims)
पवित्र रमजानसाठी मार्गदर्शक सूचना
- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तार साठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.
2. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क. सँनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.
3. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव 30 दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पुर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
4. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.
5. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या 26 व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.
6. पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.
7, धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत;
8. कोवीड-19 या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात 144 कलम लागू असल्याने तसेच रात्रीची
संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.
9. या पवित्र रमजान महीन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
10. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.
11.पवित्र रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
12. कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
संबंधित बातम्या :
घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार?
Maharashtra Lockdown news : राज्यात 1 मेपर्यंत कडक निर्बंध लागू, उद्धव ठाकरेंच्या घोषणा जशाच्या तशा
State government guidelines for the holy month of Ramajan for Muslims