मुंबई : राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत मंडळाने सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे 7 हजार तरुणांना नौकानयन विषयक प्रशिक्षण मिळणार आहे, अशी माहिती बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली. (Maharashtra Maritime Board sailing training to youth)
राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य प्रशिक्षण, कौशल्य वृद्धीसंदर्भात सहाय्य करण्यासाठी अस्लम शेख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) आणि चेन्नईमधील भारतीय सागरी (मेरिटाइम) विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी आणि भारतीय सागरी विद्यापीठाच्या संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी स्वाक्षरी केल्या.
सागरी उपक्रमांना चालना देण्यासाठी विद्यापीठांचं सहकार्य
सागरी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र सागरी मंडळ ही पहिलीच संस्था आहे. या करारानुसार, राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य असे तांत्रिक आणि इतर प्रशिक्षण देणे. त्यांच्यातील कौशल्य वाढविणे यासाठी भारतीय सागरी विद्यापीठ महाराष्ट्र सागरी मंडळाला सहकार्य करणार आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागातील सागरी उपक्रमांना चालना देण्यासाठी विद्यापीठ सहकार्य करणार आहे. त्याशिवाय सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन, अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण यांचा आराखडा तयार करण्यासाठीही विद्यापीठ सहकार्य करणार आहे.
राज्यातील नौकांमधील मनुष्यबळास प्रशिक्षण, कौशल्य विकास यासंदर्भात सहाय्यासाठी आज महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि भारतीय मेरीटाइम विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
(1/2) pic.twitter.com/MO0VjvpTcB— Aslam Shaikh, INC (@AslamShaikh_MLA) March 1, 2021
राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासासाठी लाभ
महाराष्ट्र सागरी (मेरीटाईम बोर्ड) मंडळाने देशात प्रथमच भारतीय सागरी विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला आहे. ही अभिमानस्पद गोष्ट आहे. या करारामुळे नौकानयन क्षेत्रात कुशल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे राज्यातील सागरी उपक्रमांना चालना मिळणार आहे. सुमारे सहा ते सात हजार तरुणांना याचा लाभ होणार आहे. तसेच विद्यापीठाच्या संशोधनाचा आणि ज्ञानाचा उपयोग राज्यातील सागरी नौकानयन क्षेत्राच्या विकासासाठी होणार आहे.
मेरिटाईम इंडिया समिटमध्ये महाराष्ट्राचा सहभाग
केंद्र शासनाच्या नौकानयन मंत्रालयातर्फे आयोजित व्हर्च्युअल मेरिटाईम इंडिया समिट 2021 मध्ये महाराष्ट्राचे पॅव्हिलियन असणार आहे. या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम, राज्यातील सागरी वाहतुकीसंबधीच्या पायाभूत सुविधा इत्यादी माहिती उपलब्ध होणार आहे. मेरिटाईम इंडिया समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले आहे. (Maharashtra Maritime Board sailing training to youth)
संबंधित बातम्या :
भिवंडीतील आदिवासी शिधापत्रिकाधारक तीन महिने धान्यापासून वंचित
शिक्षण संस्थांना अतिरिक्त शुल्क घेण्यास मज्जाव; शिक्षण शुल्काबाबत कोर्टाचा मोठा निर्णय