Dhananjay Munde Health Update | भोवळ आल्याने शुद्ध हरपलेली, धनंजय मुंडेंना हार्ट अटॅक नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण
काल पक्ष कार्यालयात पवार साहेबांकडे असताना धनंजय मुंडेंना अचानक भोवळ आली. त्यानंतर काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांना इथे आणलं तेव्हाही ते अनकॉन्शस होते. एमआरआयनंतर त्यांना शुद्ध आली, असं अजित पवारांनी सांगितलं
मुंबई : ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री त्यांना हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र बुधवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याच्या वृत्ताचं खंडन केलं. भोवळ आल्याने काल त्यांची शुद्ध हरपलेली होती, मात्र धनंजय मुंडे यांची प्रकृती आता बरी आहे, त्यांना आयसीयूमध्येमध्ये ठेवण्यात आलं आहे. मी डॉक्टरांशी बोललो. त्यांचं फुल चेक अप करण्यात येणार आहे. त्यांना माईल्ड हार्ट अटॅक आल्याचं वृत्त काल पसरलं होतं, मात्र त्यात तथ्य नाही. दोन-तीन दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल, आज दुपारी त्यांना स्पेशल रुममध्ये शिफ्ट केलं जाईल. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
काल पक्ष कार्यालयात पवार साहेबांकडे असताना धनंजय मुंडेंना अचानक भोवळ आली. त्यानंतर काही काळ त्यांची शुद्ध हरपली होती. त्यांना इथे आणलं तेव्हाही ते अनकॉन्शस होते. एमआरआयनंतर त्यांना शुद्ध आली. त्यांना सध्या कोणतंही पथ्य नाही, सगळं जेवण करु शकतात. त्यांची फॅमिली बरोबर आहे, घाबरण्याचं कारण नाही, कार्यकर्त्यांनी इथे येऊन गर्दी करु नये, मी आज रात्री पुन्हा येईन, असंही अजित पवारांनी सांगितलं.
उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. त्यामुळे त्यांच्याच विभागाचा कार्यक्रम आहे, त्याबद्दल ते विचारत होते, मात्र आम्ही त्यांना सांगितलं की बाकीचे आम्ही मिळून कार्यक्रम करु, तुम्ही व्यवस्थितपणे तब्येतीची काळजी घ्या, काही बंधनं पाळावी लागतील, डॉक्टरांना मी सांगितलं की तुमचं समाधान होईल, तेव्हाच त्यांना सोडा, असंही अजित पवार म्हणाले.
राजेश टोपे यांनी काय सांगितलं होतं?
“धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर डॉ. समधानी लक्ष ठेवून आहेत. त्यांनी एमआरआय केले असून सर्व नॉर्मल आहे. माझ्या मते जे काही वायटल पॅरामीटर म्हणतो, ते सर्व ठीक आहेत. मी त्यांच्यासी अर्धा तास चर्चा केली. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी रात्री दिली होती.
दगदगीमुळे त्रास झाल्याची शक्यता
आम्हा सर्व राजकारणी मंडळींना रात्रंदिवस काम असते. त्यात धावपळ होते. सोमवारी ते परभणीवरुन आले. मंगळवारी जनता दरबार होता. या कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते. डॉक्टरांनी मला बुधवारी बोलावलं आहे. धनंजय मुंडे आमचे शेजारी आहेत. आमच्या मराठवाड्याचा भूमिपूत्र आहे. मी त्यांना सांगितलं की नॉर्मल राहा. चिंता करू नका, असा मित्रत्वाचा सल्ला मी त्यांना दिला आहे. त्यांनी जरा आराम केला, तर सर्व गोष्टी ठीक होतील” अशीही माहिती राजेश टोपे यांनी मंगळवारी रात्री दिली होती. संबंधित बातम्या :
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल