Maharashtra MLC Election : अजितदादा मैदानात उतरलेत, त्यांचा रुबाब आणि दराराच वेगळा: संजय राऊत
Maharashtra MLC Election : काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी होकार दिला असता तर रंगत आली असती. त्यांना अनेक राज्यातून मते मिळाली असती. पण त्यांनी काही कारणास्तव नकार दिला आहे. पवार हे राजकारणातील भिष्मपितामह आहेत.
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा रुबाब आणि दरारा वेगळा आहे. ते आता मैदानात उतरलेले आहेत. त्यांचे निवेदन मी काल ऐकलं आहे. राज्यसभेत आपण गाफील राहिलो असून आता गाफील राहणे चुकीचे ठरेल. आता सगळ्यांनी सक्रिय व्हायला हवं, असं अजितदादांनी सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही सक्रिय झालो आहोत, असं सांगतानाच निवडणुकीत राजकीय पक्ष सक्रिय नाही झाले तर कधी होणार? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. बविआबद्दल मला फारसे माहीत नाही, असं सांगतानाच विरोधकांना संपवायचा प्रयत्न करत असतील तर आम्ही पाहून घेऊ. लढत राहू, असंही त्यांनी सांगितलं. संजय राऊत मीडियाशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीवर (Maharashtra MLC Election) करताना अजित पवार यांचं कौतुक केलं.
संजय राऊत यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबतही भाष्य केलं. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी होकार दिला असता तर रंगत आली असती. त्यांना अनेक राज्यातून मते मिळाली असती. पण त्यांनी काही कारणास्तव नकार दिला आहे. पवार हे राजकारणातील भिष्मपितामह आहेत. परंतु त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. मात्र, आता यूपीएने कोणताही उमेदवार देऊन चालणार नाही, असं राऊत म्हणाले.
ऊर्जाच निघून गेली
विरोधी पक्षाने राष्ट्रपतीपदाची तयारी किमान 6 महिने आधी करावी. पवार साहेबांनी नकार दिल्यामुळे या निवडणुकीतील ऊर्जाच निघून गेली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांशी संवाद सुरू आहे. देशाला मान्य होईल अशी व्यक्ती त्या ठिकाणी बसावी असे सर्वांना वाटते. सत्ताधारी पक्षाचा नेता त्याठिकाणी पाठविला जातो. तो तेथे पक्षाचे काम करतो, ते बरोबर नाही, असं त्यांनी सांगितलं.
भाजपचा उद्धव ठाकरेंना संपर्क
शिवसेना कोणतेही नाव पुढे करणार नाही. उद्धवजी याबाबत चर्चा करत आहेत. चर्चेतून काय स्पष्ट होते ते पाहू. भाजप नेत्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली आहे, असं ते म्हणाले.
भाजप फक्त 100 मतांनी पुढे
भाजपकडे खासदारांची सर्वाधिक मते आहेत. खासदारांच्या मतांचं मूल्य अधिक आहे. पण अनेक राज्यात भाजपला बहुमत नाही. केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्लीसह अनेक राज्यात भाजपकडे कमी मते आहेत. बिहारमध्येही फिफ्टी फिफ्टीचा मामला आहे. या निवडणुकीत भाजप आणि यूपीएमध्ये फारसं अंतर नाही. काँटे की टक्कर आहे. फार फार तर भाजप 100 मतांनी पुढे असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.