‘गुवाहाटी’च्या पुनरावृत्तीचा धसका, एकाच मजल्यावर सर्व आमदार, सीसीटीव्हीची निगराणी
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या सर्व 16 आमदारांना आज परेल येथील ITC ग्रँड हॉटेल येथे बोलावलं आहे. याच हॉटेलमध्ये आजपासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आमदारांना ठेवलं जाणार आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीने 9 उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडून सर्व 9 उमेदवार जिंकून आणणार, असा दावादेखील केला जातोय. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार उभे करण्यात आले आहेत. हे तीनही उमेदवार जिंकून येतील तितकं पुरेसं संख्याबळ महाविकास आघाडीकडे सध्याच्या घडीला आहे. पण महायुतीने 9 वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. महायुतीच्या एका उमेदवारामुळे या निवडणुकीत दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून काळजी घेतली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
ठाकरे गटाने या निवडणुकीत आपल्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी जिंकून यावं, तसेच मविआचे इतर दोन उमेदवार जिंकून यावेत यासाठी ठाकरे गटाकडून काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाने आपल्या पक्षाच्या सर्व 16 आमदारांना आज परेल येथील ITC ग्रँड हॉटेल येथे बोलावलं आहे. याच हॉटेलमध्ये आजपासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आमदारांना ठेवलं जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे मुंबई पदवीधर निवडणुकीत जिंकून आल्याने त्यांच्याकडून सर्व आमदारांसाठी याच हॉटेलमध्ये आज रात्री स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा स्नेहभोजनासाठी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेलमध्ये आज महत्त्वाची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत कसं मतदान करावं, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर सर्व आमदार आज आणि उद्या रात्री याच हॉटेलमध्ये मुक्कामाला राहणार आहेत. ठाकरे गटाकडून आमदारांच्या वास्तव्यासाठी कशाप्रकारे या हॉटेलमध्ये नियोजन करण्यात आलंय, याची देखील माहिती समोर येत आहे.
कसं असणार ठाकरेचं नियोजन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या सर्व 16 आमदारांची राहण्याची व्यवस्था एकाच मजल्यावर केली जाणार आहे. आमदार आदित्य ठाकरे सर्व आमदारांसोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची शक्यता आहे. आमदारांना खेळीमेळीच्या वातावरणात ठेवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. आमदार अनिल परब यांच्याकडून आज खास मेजवाणीचा बेत आखण्यात आला आहे. तर स्थानिक आमदार अजय चौधरींकडे घरगुती जेवणाची जबाबदारी देण्यात आली आहे.